इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीचे नाते हे अत्यंत प्रेमाचे जिव्हाळ्याचे असते, खरे म्हणजे भारतीय संस्कृतीत लग्न तथा विवाह हा केवळ दोन जीवांचे मिलन नसून दोन कुटुंबांमधील कायमस्वरूपी निरंतर प्रेमाचे संबंध स्थापित करण्याचा एक मार्ग असतो असे म्हटले जाते, परंतु आजच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्याच्या वाढत्या चर्चा, तसेच एकमेकांविषयी वाढलेल्या अपेक्षा, ताणतणाव, कामाचा ताण, शारीरिक आणि मानसिक त्रास यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.
देशभरातील सर्वच राज्यात घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक असून या संदर्भातील वेगवेगळी कारणेही अत्यंत धक्कादायक अशी आहेत, उदाहरणार्थ पत्नी लवकर उठत नाही, चहा करून देत नाहीत, आई-वडिलांचे पाय पडत नाही, त्यांची सेवा करत नाही आणि त्यांना सांभाळत नाही. मुलांचा अभ्यास घेत नाही, अशी कारणे पतीकडून सांगितली जातात. तर पत्नीकडून देखील नवरा साडी घेऊन देत नाही, फिरायला घेऊन जात नाही, दागिने घेऊन देत नाही यासारखी कारणे सांगितले जातात.
खरे म्हणजे लग्नानंतर किंवा लग्नापूर्वी एकमेकांमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी शेअर करणं गरजेचं असतं. जर का त्या लपून राहिल्या तर भविष्यात त्या समोर येऊन त्याचे वेगळे परिणाम नात्यावर होतात. गैरसमज वाढत जातात. यामध्ये शारीरिक व्याधी, आजार, सवयी, व्यसनं, लग्नापूर्वीच आयुष्य याबाबत सगळेजण गुप्तता ठेवतात. आणि त्याच गोष्टी लग्नानंतर समोर येऊन गैरसमज वाढत जातात. त्यासाठी पूर्वीपासूनच स्पष्टपणा असायला हवा. सगळं काही शेअर केलेल असावं.
वाद हा अनेक वेळा अनेक कारणांमुळे होतो. पण कधीकधी कारणाअभावी सुद्धा वाद होतो. यामध्ये चिडचिड, कामाचं टेन्शन, हे सगळं जर घरात निघालं तर वाद होतात. काम कामाच्या जागी अन घर घराच्या जागी असलं तर मग हे होत नाही. पण हे सर्वजण विसरतात. आणि यामुळे घरातल सुख हरवून जात आणि नात्यातला संवाद आणि आनंद संपतो. परिणामी वाद उभे राहतात. आणि हा वाद विकोपाला जाऊन नातं तुटण्यापर्यंत पोहचतो.
वास्तविक लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. पण त्या सुटायला किवा तुटायला क्षुल्लक वाटावे, असे एखादे कारणही पुरेसे होते. याचाच प्रत्यय गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या घटस्फोटांच्या वाढत्या संख्येतून येत आहे. घटस्फोटांची केवळ संख्याच वाढत नाही, तर त्यासाठी दिल्या जाणाऱ्या नित्याच्या कारणांतही आमूलाग्र बदल होताना दिसत आहे.
पती पत्नीचेच नव्हे नातं कोणताही असला तरी त्यात सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे विश्वास. एकमेकांवर विश्वासच नसेल तर संशय निर्माण होतो. आणि हा संशय माणसाला आणि नात्याला पोखरून जातो. अनेक जोडपी विश्वास तुटल्याने विभक्त होतात. अनैतिक संबंध, व्यसन, खोटेपणा ह्यातून नात्यातली दरी वाढत जाते. नातं हे विश्वासाच्या बळावर उभ असत. आणि हा विश्वास प्रत्येक नात्यामध्ये असायलाच हवा.
आपल्याकडे कुठे थांबायला हवे याचीही माहिती नसते. बायकोला ही मत आहे आणि नवराही आपल्याला बोलू शकतो हे दोघांनाही कळायला हवं असत. पण प्रगल्भतेचा अभाव असल्याने हे होत नाही. आणि दोघांकडेही त्यातून वाद होतात. ही प्रगल्भता दोघांनीही आत्मसात करायला हवी. ती असेल तर अनेक गोष्टी समजून घ्यायला सोप्या जातात.
नात्यातली अपेक्षा ही कोणाकडे बघून असू नये. एखाद्याची श्रीमंती बघून आपलाही नवरा असा असावा असं म्हणून त्याच्याशी वाद करणं योग्य नाही. तर एखाद्याची सुंदर बायको बघून आपली बायको ही अशीच सुंदर असायला हवी असं म्हणून तिला दोष देणं योग्य नाही. अपेक्षा ही अवास्तव झाली की वाद होतोच. अशा अपेक्षा टाळायलाच हव्या.
गेल्या काही वर्षांत चित्रविचित्र कारणांमुळे झालेल्या घटस्फोटांची जंत्री एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. लग्नापूर्वीचे घर मोठे होते. लग्नानंतर लहान घरात राहावे लागत आहे. मोठ्या घरासाठी नवरा काहीच करत नाही या कारणास्तव देखील घटस्फोट झाला आहे. तसेच पत्नीचे वजन वाढले आणि तिचे शरीर बेढब दिसू लागले. अनेकवेळा सांगूनही तिने त्यासंदर्भात काहीच केले नाही त्यामुळे मानसिक त्रास झाल्याचे सांगत एका पतीने काडीमोड घेतला.
दीड महिना सकाळचा पहिला चहा पत्नीने करून दिला नाही तसेच मित्र आल्यानंतर देखील चहा करण्यास नकार दिला, त्यामुळे अपमान झाला या कारणास्तव एका व्यक्तीने घटस्फोट घेतला.
आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव पत्नीच्या हाताला नाही. यामुळे जेवणाचा भ्रमनिरास होत असल्याचे सांगत एक जण पत्नीपासून विभक्त झाला.
पत्नीच्या गालावर अनेक पिंपल्स आहे. त्यामुळे मला मानसिक त्रास होतो. ती नकोशी वाटतेय, या कारणास्तव ही एकाचा घटस्फोट झाला आहे. करवाँ चौथला पतीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार न केल्यामुळे अनादर झाल्याच्या भावनेतून भांडण झाल्यानंतर एका पतीने घटस्फोट घेतला.
नवऱ्याला मी खूप आवडते आणि तो कधीच भांडत नाही. कधीच विरोध करत नाही. पत्नीचे सर्वच त्याला पटते, यामुळे वैताग होत असल्याच्या भावनेतून एक महिला पतीपासून विभक्त झाली. तर प्रेम विवाह केलेल्या एका मुलाने लग्नानंतर आपण मांसाहार करणार नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही त्याला मांसाहाराची इच्छा अनावर झाल्याने त्याने अनेक रात्री मित्रांकडे राहत मांसाहार केल्याचे पत्नीला समजले. पत्नीने फसवणूक झाल्याचे सांगत घटस्फोट घेतला. याशिवायही अनेक कारणे आहेत.
Husband Wife Divorce Reasons Survey Report