नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील ऐतिहासिक युनेस्कोच्या जागतिक वारशात समावेश असलेल्या कुतूब मिनार परिसरातील मुघल मशिदीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे. गेल्या ४७ वर्षांपासून या मशिदीचे काम पाहणारे इमाम मौलान शेर मोहम्मद यांनी हा दावा केला आहे. नमाजपठणावर बंदी घातल्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
एएसआयच्या अधिपत्याखाली आल्यापासून संबंधित ठिकाण प्रार्थनास्थळ म्हणून कार्यरत असेल, तरच एएसआयकडून संरक्षित स्थळांच्या परिसरात धार्मिक प्रथांची परवानगी दिली जाते, असे स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे धोरण निर्जिव ठिकाणी पूजेची परवानगी देत नाही. हा आदेश आता काढला असे नाही, हा नियम पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. एएसआयच्या धोरणानुसार, संबंधित ठिकाणी नमाज पठण बंद करण्यासंदर्भात यापूर्वी पत्र लिहिण्यात आले होते. अखेरचा निर्देश काही महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला होता, असे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी सांस्कृतिक मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला कुतूब मिनार परिसरात खोदकाम करण्याचे आदेश दिले होते. या वृत्तावरून वाद निर्माण झाला होता. परंतु सांस्कृतिककार्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी हे वृत्त फेटाळले होते. असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे रेड्डी यांनी म्हटले होते. वाद निर्माण झाल्यानंतर सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन आणि एएसआय अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने साईटचा दौरा केला होता. त्यानंतर अफवांना आणखी पेव फुटले. असे पाहणी दौरे नियमितरित्या केले जातात. याचा परिसरात खोदकाम करण्याच्या वादाशी काहीच संबंध नाही, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले होते.
तथापि एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून कुतूब मिनारच्या आसपास जैन आणि हिंदू मंदिरांच्या प्रतिमांची एक यादी तयार करण्याचा विचार करत आहे. कुतूब मिनार परिसरात सापडलेल्या हिंदू आणि जैन मूर्ती प्रदर्शित करण्यावर सांस्कृतिक मंत्रालय विचार करत आहे. परिसरात उत्खनन करण्याचे किंवा कोणत्याही धार्मिक प्रथा रोखण्याचे कोणतेच नियोजन नाही.
कुव्वत-उल-इस्लाम मशिदीत सापडलेल्या गणपतीच्या दोन मूर्ती परिसरातून बाहेर आणाव्यात, अशी मागणी राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरण (एनएमए)चे अध्यक्ष तरुण विजय यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मंदिरे तोडून कुतूब मिनार तयार करण्यात आले होते, असा दावा माजी सांस्कृतिक कार्य मत्री प्रल्हाद पटेल यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यानंतर या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, दिल्लीच्या एका न्यायालयाने एएसआयला अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी निखिल चोपडा यांनी पुढील आदेश देईपर्यंत दोन्ही गणेश मूर्ती हटवू नयेत असे आदेश दिले होते.