कोची (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या संदर्भात आहे. न्यायालयाने या याचिकेवर त्यांचे उत्तर मागवले आहे.
ही याचिका भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी दाखल केली आहे.
त्यांनी वायनाड मतदारसंघातून प्रियंका यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. नव्या हरिदास यांचा आरोप आहे, की प्रियंका यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती योग्यरीत्या जाहीर केली नाही. हरिसाद यांचा दावा आहे, की प्रियंका यांनी जाणीवपूर्वक संपत्तीची माहिती लपवली. जेणेकरून निवडणुकीचा निकाल प्रभावित होईल. हे वर्तन ‘भ्रष्ट आचारधर्म’ म्हणून गणले जाऊ शकते. त्यांनी खोटी माहिती देऊन आचारसंहितेचाही भंग केला असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार आहे.
प्रियंका यांनी निवडणूक अर्जात १२ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यांच्याकडे ४.२४ कोटींची चल संपत्ती आणि ७.७४ कोटींची अचल संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्याशिवाय, त्यांनी पती रॉबर्ट वधेरा यांच्या मालमत्तेचाही तपशील दिला होता. वधेरा यांच्याकडे एकूण ६५.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यामध्ये ३७.९ कोटींची चल मालमत्ता आणि २७.६४ कोटींची अचल मालमत्ता आहे.