नागपूर – आयुर्वेदामध्ये आवळा या फळाचे खूप महत्व सांगितले आहे. आवळा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि गुणकारी असल्याचे म्हटले जाते. आवळा चवीला किंचित तुरट आणि आंबट असल्याने तो उन्हाळा ऋतु खाल्ला जातो परंतु हिवाळ्यात देखील आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत, असे आरोग्य तज्ज्ञाचे मत आहे.
आवळा खाण्याचे फायदे आपण अनेकदा वाचले आणि ऐकले असून आवळा एक चांगले फळ आहे. त्याचे सौंदर्यपासून ते आरोग्यापर्यंत अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात आवळा खाण्यावर विशेष भर दिला जातो. लोक ते चवनप्राश, रस, पावडर, मुरंबा किंवा कँडी अशा अनेक प्रकारात खातात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नागरिकांचे लक्ष प्रतिकारशक्ती वाढवण्यावर केंद्रित झाले आहे.
केवळ कोरोनाच नाही तर अनेक प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. यासाठी आवळा उपयुक्त ठरतो, यामध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. ते वृद्धत्वाची चिन्हे टाळतात आणि आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे चांगले असतात. हिवाळ्यात आवळा खाणे फायदेशीर आहे कारण हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शन, खोकला-ताप किंवा वजन वाढणे यासारख्या समस्या जास्त होतात.
हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही उद्भवते. मात्र दररोज १ आवळा खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच आवळा कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवतो. त्यामुळे ते तुमच्या हृदयासाठी चांगले आहे. तथापि, जर आपल्याला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा उपचार सुरू असतील, तर आवळा खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
साधारणतः आवळा हा सकाळी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात व्हिटॅमिन सी असते. परंतु जर आपल्याला अॅसिड तयार होण्याची समस्या असेल तर ते रिकाम्या पोटी खाणे टाळा. तसेच आवळा जास्त प्रमाणात खाऊ नका. आयुर्वेदात रात्री आवळा खाण्यास मनाई आहे. यामुळे घसा खवखवणे आणि दात कमकुवत होऊ शकतात. दुसरीकडे, खोकला किंवा कफाचा त्रास असला तरीही आवळा खाऊ नका.