इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरावरील एक गाणं आलं आणि तुफान गाजलं देखील. शंकरावरील लोकप्रिय गाण्यांच्या यादीत आजही या गाण्याचा उल्लेख केला जातो. आजसुद्धा अनेकांच्या मोबाइलमध्ये रिंगटोन म्हणून ‘हर हर शंभू’ हे गाणं वाजतं. भलतंच लोकप्रिय झालेलं हा गाणं वादातही सापडलं होतं. हे गाणं गायलेल्या गायिकेचे अर्थात अभिलिप्सा पांडा हिचे नवीन गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. नवरात्रीनिमित्त अभिलिप्सा देवीवरील नवीन गाणं प्रदर्शित करणार आहे.
वयाच्या चौथ्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केलेल्या अभिलिप्सा हिचे पहिले गुरु तिचे आजोबाच होते. सुरुवातीला तिने आजोबांकडून संगीत शिकण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून सुरू झालेला तिचा प्रवास आजही अविरत सुरू आहे. नुकतंच अभिलिप्साने या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘नव दुर्गे नमो नम:’ असं या गाण्याचं नाव आहे. हर हर शंभूच्या तुफान लोकप्रियतेनंतर चाहत्यांना तिच्या या गाण्याची फारच उत्सुकता आहे.
अभिलिप्सा ही मूळची ओडिशाची. तिचे वडील निवृत्त लष्कर अधिकारी तर आई शिक्षिका आहे. गायनक्षेत्रात करिअर करण्यासाठी अभिलिप्साला तिच्या आईवडिलांनी नेहमीच मदत केली. अभिलिप्सा ही उत्तम गायिका तर आहेच, पण त्याचसोबत ती उत्तम शास्त्रीय नृत्यांगनासुद्धा आहे. मार्शल आर्ट आणि कराटेमध्येही अभिलिप्सा पारंगत आहे. २०१९ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील कराटे चॅम्पियनशिपमध्ये अभिलिप्साने सुवर्णपदक पटकावलं होतं. अभिलिप्साचे आजोबा पश्चिम ओडिशातील प्रसिद्ध कथाकार होते. अभिलिप्सा हिला एक लहान बहीण असून ती देखील उत्तम गाते.
Har Har Shambhu Abhilipsa New Song