इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपले आहे. येत्या ८ डिसेंबरला त्याचे निकाल हाती येणार आहेत. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज सर्वांसमोर आले आहेत. त्यानुसार, गुजरातमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने सत्तेवर येऊ शकतो. दुसरीकडे हिमाचल प्रदेशात चुरशीची लढत झाली आहे. काँग्रेस सत्ताधाऱ्यांना कडवी टक्कर देताना दिसत आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधूनही हीच बाब समोर आली आहे. मात्र, प्रत्यक्ष निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहेत.
गुजरातमध्ये पुन्हा भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार
– न्यूज एक्स-जन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजप गुजरातमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू शकते. यावेळी भाजपला 117-140, काँग्रेसला 34-51 आणि आम आदमी पार्टीला 6-13 जागा मिळू शकतात.
– रिपब्लिक टीव्ही आणि पी-मार्केच्या एक्झिट पोलमध्येही भाजप गुजरातमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. यावेळी भाजपला 128-148, काँग्रेसला 30-42 आणि आम आदमी पार्टीला 2-10 जागा मिळू शकतात, असे सांगण्यात आले आहे.
– टीव्ही-9 गुजरातीच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची लाट पाहायला मिळाली आहे. येथे सत्ताधारी पक्षाला 125-130, काँग्रेसला 40-50 आणि आम आदमी पक्षाला 3-5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
– इंडिया टुडे ग्रुप-अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये भाजपला 128-144 जागा, काँग्रेसला 30-42 आणि आम आदमी पार्टीला 2-10 जागा मिळू शकतात.
हिमाचल प्रदेशात टश्शन
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसची चुरशीची लढत आहे.
– इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडियानुसार, राज्यात भाजपला 24-34 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 30-40 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचा सफाया झाला आहे.
– इंडिया टीव्ही-मॅट्रिक्सच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला 35-40 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 26-31 जागा मिळू शकतात.
– न्यूज एक्स-जन की बातनुसार, भाजपला 32-40 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 27-34 जागा मिळू शकतात.
– रिपब्लिक टीव्ही-मार्क्यूनुसार, भाजपला 34-39, काँग्रेसला 28-33 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आम आदमी पक्ष
एकंदरीत, यावेळी गुजरातमध्ये भाजपला आणखी 32 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना, हिमाचल प्रदेशातही भाजपला 9 जागा गमावण्याची शक्यता आहे. काँग्रेसला गुजरातमध्ये 37 जागा कमी पडतील, तर हिमाचलमध्ये 8 जागांचा फायदा होईल. हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाचा पूर्ण सफाया झालेला असेल तर गुजरातमध्ये ‘आप’ला 7 जागा मिळू शकतात.
2017 मध्ये गुजरातचा निकाल
गुजरातमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी भाजपच्या विजयाचे दावेही करण्यात आले होते, ते खरे ठरले. त्यावेळी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या.
2017 मध्ये हिमाचलचा कौल
2017 मध्ये भाजपने हिमाचल प्रदेशमध्ये 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला २१ जागांवर समाधान मानावे लागले. एक जागा माकपने तर दोन जागा इतरांनी जिंकल्या.
Gujrat Himachal Pradesh Election Exit Poll Results