इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जर्मन रिटेलर कंपनी Metroने भारतातून आपला व्यवसाय गुंडाळण्याची तयारी केली आहे. Metro AG ची भारतीय उपकंपनी Metro Cash & Carry India मधील आपला हिस्सा विकण्यासाठी भागीदार शोधत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. कंपनीने टाटा आणि अंबानी उद्योग समुहाशी याबाबत संपर्क केल्याचे सांगिजते जात आहे. त्यामुळे ही कंपनी कुणाच्या मालकीची होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांनी सांगितले की, मेट्रो एजी आता आपल्या भारतीय हाताच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर धोरणात्मक बाह्य टाय-अप शोधत आहे. याबाबत बँकर्सशी काही चर्चा झाली आहे. मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाचे भारतात ३० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, मेट्रो एजीने मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल, राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स (डी-मार्ट) आणि टाटा समूहाशी संपर्क साधला आहे. याशिवाय, अॅमेझॉन, थायलंडचा सीपी ग्रुप, लुल्लू ग्रुप, आणि पीई फंड समारा कॅपिटल यांच्याशी प्रारंभिक टप्प्यातील बोलणी झाल्याचे सांगितले जाते.
भारतातील व्यवसाय वाढविण्यासाठी आणि अधिक स्टोअर्स जोडण्यासाठी अधिक गुंतवणूकीची गरज आहे. त्याचवेळी मेट्रो एजीच्या प्रवक्त्यानेही कंपनी धोरणात्मक पर्यायांचा आढावा घेत असल्याचे मान्य केले आहे. कंपनीने सांगितले आहे की, “मेट्रो इंडिया हा घाऊक विक्रीसाठी प्रचंड क्षमता असलेला वाढता व्यवसाय आहे. मेट्रोची विद्यमान घाऊक क्षमता वाढवण्यासाठी आणि भारतातील व्यवसाय वाढीला गती देण्यासाठी आम्ही संभाव्य भागीदारांसह पर्यायांचे पुनरावलोकन करत आहोत.”