अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या सुरगाणा आदिवासी बहुल तालुक्यातील वाघधोंड ग्रामपंचायत हद्दीतील साबरदरा येथे स्मशानभूमी अभावी अक्षरशःभरपावसात चक्क प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेऊन अंत्यविधी उरकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. एका वृद्ध महिलेचे निधन झाले. मात्र सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. साबरदरा येथील स्मशानभूमी तीन किलोमीटर अंतरावरील कहांडोळचोंड शेजारी कासूटन्याचा कुंड येथे असून, तिथे जाण्यासाठी रस्ताही नसल्याने भरपावसात प्रेत कसे न्यायचे हा प्रश्न असतांना ग्रामस्थांनी शेताच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घेऊन कसे बसे सरण रचत चितेला मुखाग्नी दिला. पावसाळ्यात स्मशानभूमी शेड व रस्ता नसल्याने प्रेताला मारणानंतरही अवहेलना सोसावी लागते. ग्रामिण भागात प्रत्येक गावात स्मशानभूमी शेड व रस्ते उभारावे व प्रेतांची होणारी अवहेलना थांबवावी अशी मागणी होत आहे.