नाशिक : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांचे आज बुधवारी ( दि. ५ मे ) पहाटे निधन झाले. ते ९७ वर्षाचे होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग घेतला होता. महात्मा गांधी यांच्या विचाराचे ते पाईक होते. गांधीवादी कार्यकर्ता म्हणून ते नाशिक जिल्ह्यात परिचित होते. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. स्वातंत्र्यसैनिक संघटना, खादी व ग्रामोद्योग यासह अनेक संघटनांचे ते पदाधिकारी होते.
स्वातंत्रसैनिक वसंत हुदलीकर हे नाशिकच्या राजकीय असो की सामाजिक सर्व क्षेत्रात ‘बाबा ‘ या नावाने परिचित होते. शिस्तीने अत्यंत कडक वाटणारे बाबा मुळात अधिक मृदू स्वभावाचे होते. अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती, अनेकांच्या समस्या किंवा संकटात बाबा त्यांना साथ द्यायचे, नाशिकचे हुतात्मा स्मारक हे स्वतंत्र लढ्यातील क्रांतीकारक आणि हुतात्मा यांचे स्मृतिस्थान त्यांनी जीवनभर सांभाळले . इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विखुरलेल्या स्वातंत्रसैनिकांची संघटना त्यांनी उभी करून त्यांच्या समस्या मार्गी लावल्या. हुतात्मा स्मारक याठिकाणी आलेल्या प्रत्येकाला बाबांकडून स्वातंत्र्य लढ्याची स्मृती ऐकायला मिळत असे, त्या काळातील कित्येक आठवणी ते निरंतर सांगायचे, हुतात्मा स्मारकात अनेक सामाजिक संस्था आपले उपक्रम बैठका घेण्यासाठी बाबांचे सहकार्य मिळत असे. मात्र येथील शिस्तीत ते तडजोड ते सहन करत नव्हते, असा त्यांचा स्वभाव तसा शिस्तीचा भाग होता,आज हुतात्मा स्मारक जे काही चांगल्या स्थिती आहे त्यामागे संपूर्ण कष्ट वसंत हुदलीकर बाबा यांचे आहे, बाबा यांनी हुतात्मा स्मारकात अनेक निराधार मुलांना सांभाळले,
कित्येक मुले येथे राहिली बाबांच्या सावलीत वाढून ती मुले आज मोठ्या अधिकरी पदावर आहेत. २०११ साली अण्णा हजारे यांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून नाशिकमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध बाबांनी आंदोलन केले होते. त्यानंतरही त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले – छगन भुजबळ
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे आज वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. अत्यंत दुःख झाले. मुळचे समाजवादी पक्षाचे असलेले कै. वसंतराव हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक देशातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील हुतात्मा स्मारकाचे ते सर्वेसर्वा होते. याठिकाणी खेड्या पाड्यातील विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुरुकुलासारखे सांभाळत होते. तसेच शहीद कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा पुढाकार होता. महात्मा गांधीच्या विचारांची जोपासना करत आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी खर्ची केले. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले आहे. त्यांच्या निधनाने हुदलीकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय हुदलीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ
मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा