नवी दिल्ली – भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अमित खरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात उच्च शिक्षण सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. ते दोन महिने या पदावर काम करतील, असे कार्मिक मंत्रालयाने नियुक्तीचा आदेश जारी करताना म्हटले आहे.
अमित खरे हे १९८५ च्या बॅचचे झारखंड कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मनुष्यबळ विकास आणि माहिती प्रसारण मंत्रालयात सचिवपदावरही काम केले आहे. झारखंडमधील चाईबासामध्ये ९० च्या दशकात ते जिल्हाधिकारी होते. त्यांच्या कार्यकालात चारा घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता.
जिल्हाधिकारी असताना त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरूनच चारा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकार्यांना दोषी ठरविण्यात आले होते. लालू प्रसाद यादव आतापर्यंत चारा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात रांचीमधील कारागृहात शिक्षा भोगत होते. अमित खरे यांनी पंतप्रधानांच्या आदेशानुसार नवे शिक्षण धोरण २०२० बनविण्यात आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात असताना डिजिटल मीडिया नियमांमध्ये बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
गेल्या काही दिवसात माजी कॅबिनेट सचिव पी. के सिन्हा आणि माजी सचिव अमरजित सिन्हा यांनी पीएमओच्या सल्लागारपदावरून राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर आता अमित खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित खरे यांच्या पत्नी निधी खरे यासुद्धा झारखंड कॅडरच्या १९९२ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या केंद्रीय ग्राहक मंत्रालयात अतिरिक्त सचिवपदावर कार्यरत आहेत.