नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या काही दिवसातच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. १ ऑक्टोबरपासून ग्राहक तथा नागरिकांसाठी बँकिंग संदर्भातील महत्वाच्या गोष्टी बदलणार असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होईल. नवीन नियम लागू केल्यानंतर बँकीग संबंधित कामे करण्याच्या पद्धतीत बदल होईल. त्यामुळे आवश्यक ती काम पूर्ण करावीत, अन्यथा नुकसान होऊ शकते.
सध्या बँकेशी संबंधित अनेक नियम दिवसेंदिवस बदलत आहेत. या बदलांचा परिणाम बँक ग्राहकांच्या जीवनावर होणार आहे. पुढील महिन्यात बदलत असलेल्या नियमांमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित गोष्टींचा यात समावेश आहे. मात्र यासाठी आरबीआयने काही मुदतही दिली आहे. याशिवाय इतर अनेक विभागांकडूनही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
डेबिट व क्रेडिट कार्ड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा दि. १ ऑक्टोबरपासून कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम बदलणार आहे. तसेच टोकनायझेशन सिस्टममध्ये बदल केल्यानंतर कार्डधारकांना पेमेंटबाबतचा आणखी चांगला अनुभव येईल तसेच डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डचे व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहेत, असा आरबीआयकडून केला जात आहे.
ग्राहकांचे सर्व तपशील
ग्राहकाने डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) किंवा अॅपद्वारे व्यवहार केले तर त्याचे सर्व तपशील अॅनक्रिप्टेड कोडमध्ये सेव्ह केले जातील. आतापर्यंत आपण कोणत्याही POS, ऑनलाइन किंवा अॅपवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार करतो, तेव्हा त्याचे तपशील कंपनीच्या सर्व्हरमध्ये सेव्ह केले जातात. आपण पुन्हा ऑनलाइन किंवा अॅपवर पेमेंट करण्यासाठी जातो तेव्हा तिथे खाते क्रमांक, कार्ड क्रमांक इत्यादी आधीच येत असतात. फक्त सीव्हीव्ही पुन्हा प्रविष्ट केल्यास पेमेंट केले जाते. मात्र दि. १ ऑक्टोबरपासून हे होणार नाही कारण कंपनीच्या सर्व्हरमध्ये डेटा स्टोअर नसेल. तर कार्डशी संबंधित प्रत्येक माहिती एका अॅनक्रिप्टेड कोडमध्ये जाईल त्यामुळे ती वाचता येणार नाही.
हे करण्यास मनाई
नवीन नियमानुसार, रिझर्व्ह बँकेने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा डेटा संग्रहित करण्यास मनाई केली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, त्याचे एक टोकन असून हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल. तसेच याची अंमलबजावणी झाल्यानंतर, ऑनलाइन पेमेंटसाठी, थेट कार्ड वापरण्याऐवजी, एक टोकन वापरावे लागेल.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना ही सरकारच्या लोकप्रिय पेन्शन योजनांपैकी एक आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ५ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. मात्र दि. ऑक्टोबरपासून या योजनेमध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन नियमांनुसार आता आयकर भरणारे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत आपण करदाते असाल तरीही त्यात गुंतवणूक करू शकता. त्यानंतर मात्र संधी मिळणार नाही.
डिमॅट खाते
शेअर बाजारात शेअर्सची खरेदी किंवा विक्री करत असलेल्या डिमॅट खातेधारकांसाठी नवीन नियम करण्यात आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने ( एनएसइ) यापुर्वी एक परिपत्रक दिले होते. त्यानुसार डिमॅट खातेधारकांसाठी दि.३० सप्टेंबर २०२२ पर्यंत द्वि-घटक प्रमाणीकरण सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डीमॅट खातेधारकाला त्याच्या डीमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी एक घटक म्हणून बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरावे लागेल. यासोबतच अन्य मार्ग म्हणजे हा पासवर्ड, पिन किंवा कोणताही पोझिशन घटक हा फक्त वापरकर्त्याला माहीत असावा लागतो.
Finance Big Changes from 1 October 2022
Money Credit Debit Card