मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारची कुठलीही जाहिरात असो किंवा उपक्रम असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची छायाचित्रे आपल्याला आवर्जून बघायला मिळतात. पण आता यापुढे हे छायाचित्र वापरताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हा २०१४ चा नारा भाजप सरकारने २०१९ पर्यंत कायम ठेवला. पुढे राज्यात सरकार बदललं आणि त्यामुळे फडणवीसांचा चेहरा जाहिरातींमधून गायब झाला. पण शिंदे-भाजप युती झाल्यानंतर फडणवीस पुन्हा सरकारमध्ये आले. पण आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा फोटो सगळीकडे झळकणार हे निश्चित होते. मात्र सरकारच्या कुठल्याही जाहिरातीत एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस यांचाही फोटो असतोच. हा फोटो वापरण्यात यापुढे अडचणी येणार आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भात आदेश दिले आहेत.
शासकीय तिजोरीतून उधळपट्टी करीत मंत्र्यांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात, असा आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ही याचिका जुनी असून जवळपास चार-पाच वर्षांपूर्वी याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीच छायाचित्रे वापरली जातील, असे आदेश दिले होते. त्यामुळे या आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करून कार्यक्रमातील छायाचित्रे वापरली जात आहेत. कारण न्यायालयाच्या आदेशांमध्ये मंत्र्यांची नावे आणि कार्यक्रमांची छायाचित्रे वापरता येतील, असा उल्लेख आहे. यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशांनुसार शासननिर्णयही जाहीर केला आहे.
अलीकडेच प्रचिती
शिवजयंतीनिमीत्त प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे स्वतंत्र छायाचित्रे नाहीत. पण त्यावर उपाय म्हणून फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख आणि कार्यक्रमातील एक छायाचित्र जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Fadnavis Photo Removed from Maharashtra Government Advertisements