नाशिक – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे कुटुंबिय मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कौटुंबिक छळ आणि हिंसाचाराची तक्रार सूनेने केल्यानंतर अखेर पिचड कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी पिचड कुटुंबियांवर काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कौटुंबिक हिसांचार प्रकरणी माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांच्या कुटूंबियांवर पंचवटी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दाद न दिल्याने सूनेने न्यायालयात धाव घेतली होती. मुलाच्या मृत्युनंतर सूनेला बेदखल केल्याने न्यायालयाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीताकडून धोका असल्याने सूनेने संरक्षणाची मागणी केली आहे. या घटनेने पिचड परिवार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मधुकर पिचड, पत्नी कमलबाई पिचड, मुलगी अश्विनी पिचड यांच्यासंह अन्य संशयितांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूनेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून आपला मानसिक व शारिरीक छळ करीत संशयी तांनी पती किरण पिचड यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. पतीच्या निधनानंतर कागदोपत्री फेरफार करून कंपनी स्व:ताच्या नावे करून घेत सासरच्या मंडळीने पिडीतेस जीवे मारण्याची धमकी देत घराबाहेर काढले. सदर कुटूंबिय धनाढ्य व राजकीय वर्चस्व असल्याने महिलेची पोलीसांकडून दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहेत.
संशयीतांचा त्रास व छळवणूक असह्य झाल्याने अखेर तिने येथील जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. अॅड. उमेश वालझाडे यांनी महिलेची बाजू मांडली. कोर्टाने संशयीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात भादवी कलम ४९८ अ,४०६,३०६,३२४,५०४,५०६,४६७,४६८,४७१,१२० ब व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पिचड कुटूंबियाकडून जीवितास धोका असून, फियार्दी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
पिचड हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते. ते आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्याकडे सध्या कुठलेही महत्त्वाचे पद नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने आता पिचड यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.