विशेष प्रतिनिधी, पुणे
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. भोसले यांची तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. फेमा १९९९ कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ईडीद्वारे भोसले यांची चौकशी सुरू आहे. तसेच, ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दशकांपासून भोसले हे वादग्रस्त ठरले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे भोसले हे सासरे आहेत. जलसंपदा विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कंत्राटाबाबतही ते वादात सापडले होते. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये विविध कंपन्यांचे शेअर्स, पुणे, गोवा आणि नागपूरमधील आलिशान हॉटेल, बँक खात्यातील रक्कम यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पूर्वी भोसले हे रिक्षा चालवायचे आणि आता त्यांची थेट ४० कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
ED has seized assets worth Rs. 40.34 Crore belonging to Avinash Bhosle and his family members under FEMA, 1999.
— ED (@dir_ed) June 21, 2021