नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मंदिराचे महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज, विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, आदी उपस्थित होते.महंत सुधीर दास महाराज यांनी मंदिराची माहिती देत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.
नाशिकमध्ये शिवसेनेचे शिंदे हे आभार दौरा निमित्त आले होते. सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे गेले. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर गोल्फ क्लब मैदान येथे त्यांची मोठी सभा झाली.
सभेत दिले हे आव्हान
माझी लाईन पुसण्यापेक्षा तुमची लाईन मोठी करा, माझ्यासारखं काम करून दाखवा, तुम्हाला सॅल्यूट करेन, असे जाहीर आव्हान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. घरी बसणाऱ्या लोकांना आता कायमचे घरी बसवण्याचे काम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला करायचे असून तसे केल्याशिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.