मुंबई – आयात शुल्क कपात केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत गेल्या एका महिन्यात ८ ते १० रुपये प्रतिकिलो घट झाली आहे. तेलबियांचे स्थानिक उत्पादन वाढल्याने आणि जागतिक बाजारात मंदीचा कल असल्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये खाद्यतेलांच्या किमती आणखी ३ ते ४ रुपये प्रतिकिलोने खाली येऊ शकतात, अशी माहिती साल्वेंट अॅक्ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए)ने या औद्योगिक संस्थेने दिली आहे.
एसईएचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले की, पामतेल, सोयाबिन आणि सूर्यफुलासारख्या सर्व तेलांच्या आंतरराष्ट्रीय किमती गगनाला भिडल्यामुळे भारतातील ग्राहकांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. एसईएच्या सदस्यांना दिवाळीपूर्वी खाद्यतेलाच्या किमती शक्य तितक्या कमी करण्याचा सल्ला दिला होता. केंद्र सरकारने खाद्यतेलाचे आयात शुल्कही कमी केले आहे.
चतुर्वेदी यांनी सांगितले की, अनेक उपाययोजनांमुळे गेल्या तीस दिवसात खाद्यतेलाच्या किमती जवळपास ८ ते १० रुपये प्रतिकिलोने कमी झाल्या आहेत. यापूर्वीसुद्धा एसईएच्या सदस्यांनी खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. एसईएच्या सदस्यांनी तेलाच्या कमी किमतीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
आमचे सदस्य भविष्यात तेलाच्या किमती ३ ते ४ रुपये प्रतिकिलो आणखी कमी करतील. त्यामुळे खाद्यतेलाच्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळायला हवा. जवळपास १२० लाख टन सोयाबिनचे पिक आणि ८० लाख टनाहून अधिक भुईमूगाच्या पिकांमुळे आता तेलाच्या किमती नियंत्रणात राहतील, असा विश्वास चतुर्वेदी यांनी व्यक्त केला.
मोहरीच्या तेलाची मागणी इतकी वाढली की, शेतकर्यांना चांगला भाव मिळाल्यामुळे पुरवठ्याची स्थिती आणखी चांगली झाली आहे. शेतकर्यांनी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच ७७.६२ लाख हेक्टर क्षेत्रात मोहरीची पेरणी केली आहे. हा आकडा यापूर्वीपेक्षा ३० टक्के अधिक आहे. आगामी वर्षात देशांतर्गत मोहरीच्या तेलाची उपलब्धता आठ ते दहा लाख टनापर्यंत वाढू शकते.