नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या १२ वर्षांच्या मुलीने १० रुपयांचे नाणे गिळल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अखेर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन तिचे प्राण वाचविले आहेत. त्यामुळे आता ही बालिका सुखरुप आहे.
ज्योती प्रकाश गवळी (वय १२ वर्षे, रा. कंधाणे, ता. सटाणा) असे या बालिकेचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी ती खेळतांना अचानक तिने १० रुपयांचे नाणे तोंडात टाकले. हे नाणे घशात अडकले. परिणामी, तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन विभागात तिची एक्स रे तपासणी करण्यात आली. त्यानंतर पूर्ण भूल देऊन दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करीत तिच्या घश्यातील नाणे काढण्यात आले.
कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ संजय गांगुर्डे, डॉ उन्मेष वरवंटकर, भूल तज्ज्ञ डॉ संध्या पाटील, डॉ संदेश आगळे तसेच अधिपरिचारिका लता परदेशी, कुलकर्णी व सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले. या बालिकेने दोन दिवस नाणे घशात कसे सहन केले याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात व अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक या सर्वांनी डॉक्टरांच्या पथकाचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.