गोरखपूर (उत्तर प्रदेश) – लग्नसोहळा म्हणजे आनंदाचा क्षण होय, परंतु या शुभकार्यात काही वेळा अचानक विघ्न येते. यामागे तसे काहीतरी कारण देखील असू शकते. उत्तर प्रदेशात असाच एक प्रसंग घडला. हे लग्न सोहळ्याप्रसंगी पोलिसांनी लग्नमंडपात एन्ट्री केली आणि तात्काळ लग्न थांबविण्याचे आदेश दिले, हे पाहून वऱ्हाडी मंडळी घाबरून गेली. नेमके काय झाले होते?
येथे एका विवाह सोहळ्यादरम्यान पोलीस अचानक लग्नाच्या स्टेजवर पोहोचले. एवढेच नाही तर पोलिसांनी वधू-वर पक्षाच्या लोकांना लग्न तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. त्यावरून गदारोळ झाला. लग्नाला उपस्थित असलेले सगळेच हैराण झाले. नेमके प्रकरण काय आहे हे सर्वांना जाणून घ्यायचे होते. यावर पोलिसांनी त्या स्टेजवरच खुलासा केला आणि उपस्थित वधू आणि तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, नवरा मुलगा आधीच विवाहित आहे.
पोलिसांच्या तोंडून या गोष्टी ऐकून नववधू मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच वेळी पोलिसांनी तात्काळ वराला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दुसरीकडे, सकाळी वराच्या पहिल्या पत्नीने आपल्या मुलाला घेऊन पोलीस ठाणे गाठले, तेव्हा पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. मात्र पंचायतीच्या निर्णयानुसार वधूपक्षाने हुंड्यात घेतलेले सामान आणि मुलीच्या कुटुंबाने खर्च केलेले पैसे वधूला परत केले. त्यानंतर त्यांच्यात करार झाला. मुलीच्या बाजूने कोणीही तक्रार दिली नाही. पोलिस ठाण्याच्या पंचायतीत झालेल्या परस्पर सामंजस्यानुसार पोलिसांनी वराला सोडून दिले.
पोलिसांनी सांगितले की, या भागातील एका गावात मिरवणूक आली होती. रात्रीच्या सुमारास ही मिरवणूक मुलीच्या घरी पोहोचली. वर मुलगा विवेकानंद यादव मंचावर पोहोचला. त्यानंतर वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालत असतानाच पोलीस तेथे पोहोचले. आणि त्यांनी खुलासा केला की, विवेकानंद यादव यांनी 2014 मध्ये प्रेमविवाह केला होता. हा विवाह अयोध्येतील एका मंदिरात पार पडला. विवेकानंद आणि पहिल्या पत्नी चार वर्षांचा मुलगाही आहे.
तिचा नवरा दुसरे लग्न करत असल्याचे पहिल्या पत्नीला कळले, पहिल्या पत्नीने पोलिसांना फोन करून या प्रकरणाची तक्रार केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा लग्नसमारंभाचा कार्यक्रम सुरू होता. पोलिसांनी लगेचच स्टेजवर चढून लग्न थांबवले. त्यानंतर पोलीस ठाण्यातच नववधूला हुंडा परत केल्यानंतर वर विवेकानंद हा पहिल्या पत्नीसह घरी परतला.