नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे होणारे गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी देव द्या, देवपण घ्या ! हा उपक्रम शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली आहे.
गोदावरी नदीच्या रक्षणासाठी गेल्या १२ वर्षांपासून अखंडपणे “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम नाशिकमध्ये राबविण्यात येतो. कोवीड सारख्या भयंकर आजाराच्या साथीच्या काळात देखील सोशल डिस्टक्शन, फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझर यांचा वावर करत हा उपक्रम अखंडपणे सुरु आहे.
चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमांतर्गत कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवातील प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे गोदावरीत विसर्जन न करता “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमांतर्गत त्या दान कराव्यात असे आवाहनही अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे.
संकलित करण्यात आलेल्या मूर्ती व निर्माल्य मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.