नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचतारांकित हॉटेलच्या पार्लरमध्ये सूचनेविरुद्ध केस कापण्याचे सांगूनही चूक केली, त्यामुळे त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचा आरोप करत एका महिलेने राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. या प्रकरणी ५ कोटी २० लाखांची भरपाई मागितली. या तक्रारीची दखल घेऊन संबंधित हॉटेलवर दोन कोटी रुपयाचा दंड ठोठवण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केसांचे रंग व वाढ करणाऱ्या वस्तूंच्या जाहिरातीसाठी दिल्लीच्या मॉडेल असलेल्या आशना रॉय यांना मोठा मोबदला मिळत असे. २०१८ मध्ये त्या आयटीसी मौर्यमध्ये हेअर ड्रेसिंगसाठी गेल्या होत्या. त्यांनी विशिष्ट स्टाइलमध्ये केस कापण्याची सूचना केली. परंतु स्टायलिस्टने तिच्या सूचनेप्रमाणे केस न कापता तिचे केस लहान केले. केस कापल्यामुळे तिच्या मॉडेलिंग व्यवसायात नुकसान झाले. त्यामुळे सूचनेविरुद्ध केस कापणे ही सेवेत कमतरता असल्याचा आरोप करत तिने राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून पाच कोटी २० लाखांची भरपाई मागितली.
पुरावा देण्यासाठी तिने व्हीएलसीसी आणि पँटिनच्या जाहिराती व माहिती पत्रकाच्या प्रती दाखल केल्या.हे सिद्ध करण्यासाठी तिने कंपनीसोबत झालेला पत्रव्यवहार व ईमेलच्या प्रती सादर केल्या. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि डॉ. एस. एम. कांतीकर यांच्या खंडपीठाने तिचा युक्तिवाद स्वीकारला.
पंचतारांकित आयटीसी मौर्य हॉटेलने महिलेला दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई सव्याज द्यावी, असे आदेश राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिले आहेत. विशेष म्हणजे तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याजासह दोन कोटी रुपये द्यावेत, असे आदेश आयोगाने दिले. मात्र राष्ट्रीय ग्राहक आयोगाने २०२१ मध्ये २ कोटी नुकसान भरपाई मंजूर केली होती. याविरुध्द आयटीसी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने ही सेवेतील त्रुटी असल्याचे मान्य केले.
Delhi ITC Mourya Hotel 2 Crore Fine Wrong Hair Cutting