नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आम आदमी पार्टीच्यावतीने संपूर्ण देशभरात दिल्लीच्या ज्या योजनेचा रोल मॉडेल म्हणून प्रचार झाला ती मोफत वीज आता बंद होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तशी घोषणा केली आहे. केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील विजेवर सध्या जी सबसिडी दिली जात आहे त्यात बदल करण्यात येत आहे. येत्या १ ऑक्टोबर २०२२ पासून हा बदल लागू होईल. जे नागरिक मागणी करतील त्यांनाच वीजेचे अनुदान दिले जाईल. म्हणजेच वीज ग्राहकाला वीज सबसिडी हवी असेल तर त्याला आताच्या प्रमाणे अनुदानित मोफत किंवा सवलतीच्या दरात वीज मिळेल. सरसकच सर्वांना मोफत वीज मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल पुढे म्हणाले की, विजेवरील सबसिडीचा लाभ घ्यायचा आहे की नाही हा पर्याय नागरिकांना उपलब्ध असेल. जे सबसिडीचा पर्याय निवड करतील त्यांना वीज सबसिडी दिली जाईल. दिल्लीतील ग्राहकांना सध्या २०० युनिटपर्यंत कोणतेही वीज बिल भरावे लागत नाही, तर महिन्याला २०१ ते ४०० युनिट वीज वापरल्यास ८०० रुपये सबसिडी मिळते.
केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील अनेक नागरिक माझ्याकडे किंवा आमच्या मंत्र्यांकडे येऊन सांगतात की, आम्हाला मोफत वीज नको आहे. आम्ही वीज बील भरायला तयार आहोत. आम्हाला मिळणाऱ्या मोफत वीजेऐवजी तुम्ही शाळांवर खर्च करा. आमच्या सबसिडीचे पैसे आरोग्यावर खर्च करा, असे सांगत असतात. त्यामुळेच आता आम्ही हा निर्णय घेतला आहे की, सरसकट सर्वांना मोफत वीज मिळणार नाही. वीजेचे अनुदान घ्यायचे की नाही, हा पर्याय आता नागरिकांनी निवडायचा आहे.