नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून कोकेन या अमंली पदार्थाची तस्करी वाढली आहे. मुंबई येथील विमानतळावर मागील महिन्यात एका महिलेच्या पर्स मधून कोट्यावधीचे कोकेन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर एका परदेशी नागरिकाकडून त्याने बुटात लपवलेले कोकेन जप्त करण्यात आले होते. मागील आठवड्यात पुण्यातही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली. आता पुन्हा एकदा नवी दिल्लीत कोकेनच्या तस्करी प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेने कॅप्सूल द्वारे हे कोकेन आपल्या शरीरात लपविले होते. या महिलेच्या शरीरातून तब्बल ८२ कॅप्सूल काढण्यात आल्या आहेत.
गिनी देशातील एका महिला प्रवाशाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले. खबऱ्याकडून माहिती मिळताच कस्टम अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला थांबवून चौकशी केली. यावेळी अधिकाऱ्यांना काही शंका आल्या. महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या शरीरात ८२ कोकेनने भरलेल्या कॅप्सूल असल्याचे आढळल्याने खळबळ माजली. यानंतर वैद्यकीय प्रक्रियेअंतर्गत डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्या शरीरातून कॅप्सूल काढण्यात आले. या कॅप्सूलची किंमत १५.३६ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कोकेनचे व्यसन फार लवकर लागते. त्यामुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोकेनावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढत जाते. कोकेनाच्या सेवनामुळे सामान्यत: निद्रानाश होतो, भूक लागत नाही, शिसारी येते व पचन-विकार होऊन क्षीणता येते. मनोऱ्हास होऊन बहुसंख्य व्यसनाधीन व्यक्ती मानसोपचार केंद्रात अत्यंत शोचनीय विषण्ण अवस्थेत मरण पावतात. संयुक्त राष्ट्रांच्या मादक पदार्थविषयक आयोगाने कोकाची पाने खाणे हे अफू, गांजा यांसारखे व्यसन ठरविले असून त्यापासून नागरिकांना परावृत करण्याचे प्रयत्न संघटितपणे चालविले आहेत.
कोकेन बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. माहितीच्या आधारे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला पकडले. ही महिला ग्रीन चॅनल पार करून इंटरनॅशनलच्या दाराबाहेर पडण्यासाठी त्या दिशेने येत होती. महिलेने अंमली पदार्थाच्या कॅप्सूल गिळल्याचे चौकशीत अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले, तेथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासात तिच्या शरीरात काही गोष्टी असल्याचे आढळून आले.
या संदर्भात विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, ८२ कॅप्सूलमधून एकूण १०२४ ग्रॅम सफेद पावडर बाहेर काढण्यात आली. ही पावडर म्हणजे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. या कोकेनची खुल्या बाजारातील किंमत अंदाजे १५ कोटी ३६ लाख रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेविरुद्ध अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.
सध्या तरुणाई अंमली पदार्थांच्या आहारी चालली आहे. राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी होत असून अनेक तस्करांवर कारवाई करण्यात आली होती. मागील आठवड्यात पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचे १ किलो कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी एका नायजेरीयन तरुणाला अटक करण्यात आली होती.
Delhi Airport Women Body 82 Capsule Cocaine Smuggling
Crime