मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशभरात कुरियर घोटाळ्यांचे प्रमाण वाढत असताना फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने राष्ट्रव्यापी सायबरसिक्युरिटी जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी स्थानिक पोलीस, सायबर सिक्युरिटी सेल्स आणि युनायटेड वे मुंबईशी भागीदारी केली आहे.
मिडल ईस्ट इंडियन सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिका, फेडएक्सचे मार्केटिंग, कस्टमर एक्सपिरियंस आणि एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन टाटीवाला म्हणाले, “२०२४ मध्ये, भारताने सायबर फसवणुकीच्या प्रकरणांत १.७ बिलियन रु. पेक्षा जास्त रक्कम गमावल्याची नोंद आहे. सायबर गुन्हे सतत वाढत आहेत त्यामुळे अशावेळी जागरूकता वाढवणे हा आपला सर्वोत्तम बचाव आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समुदायांना ज्ञान आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक अशा साधनांनी सक्षम बनवण्याचा आणि देशभरात एक माहितीपूर्ण आणि सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे.”
या सक्रिय उपक्रमाचा हेतू १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींना शिक्षित आणि सक्षम करण्याचा आहे. त्यामध्ये वरिष्ठ नागरिक, महिला आणि किशोरवयीन मुले यांच्यावर विशेष फोकस असणार आहे. त्यांच्यात सुरक्षित ऑनलाइन पद्धतींचा प्रचार करून आणि त्यांना फिशिंग, आयडेंटिटी धोके, डिजिटल पेमेंट स्कॅम आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या सायबर धोक्यांची ओळख आणि त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठीच्या कौशल्यांनी सुसज्ज करणे समाविष्ट आहे. या व्यापक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्थानिक कायदा अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देखील देण्यात येईल आणि त्यांना सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवण्यात येईल. अशाप्रकारे सर्वांसाठी एक अधिक सुरक्षित आणि संरक्षित डिजिटल ईकोसिस्टम उभी करण्यात मोठे योगदान देण्यात येईल.
युनायटेड वे मुंबईचे सीईओ जॉर्ज ऐकारा म्हणाले, “युनायटेड वे मुंबईमध्ये आमचा विश्वास आहे की, अर्थपूर्ण सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सहयोगात्मक कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. फेडएक्स, स्थानिक पोलीस, सायबर सिक्युरिटी सेल्स, एनजीओ, कॉलेजिस आणि समुदाय यांच्याशी केलेल्या भागीदारीमधून डिजिटल जगाच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने आणि ज्ञान यांनी व्यक्तींना सज्ज करण्याची आमची संयुक्त वचनबद्धता उघड दिसते. आम्ही सर्व एकत्र मिळून एक लवचिक आणि सक्षम समुदाय उभा करू इच्छित आहोत तसेच सर्वांसाठी एक सुरक्षित डिजिटल ईकोसिस्टम विकसित करू इच्छित आहोत.