नवी दिल्ली – कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशात क्रिप्टोकरन्सी कायदेशीररित्या चलन किंवा ट्रेडींग म्हणून वापरले जाणार नाहीत. त्यामुळे व्यवहारात या चलनाचा वापर करण्यास सक्त मनाई असेल, असे वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी स्पष्ट केले आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आणि सरकारने क्रिप्टोकरन्सीबाबतचा हेतू स्पष्ट केला आहे.
सोमनाथन यांनी सांगितले की, जगभरात क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. भारतातील देखील क्रिप्टोकरन्सीबद्दल विचारमंथन सुरू आहे. वास्तविक क्रिप्टोकरन्सीबाबत रिझर्व्ह बँकेने अनेक गंभीर चिंता व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर सरकारकडूनही याबाबत स्पष्ट विचार केला जात आहे.
वित्त सचिव सोमनाथन यांच्या म्हणण्यानुसार, क्रिप्टो विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी बराच अभ्यास केला जात आहे. असे असूनही, क्रिप्टोकरन्सी कोणत्याही प्रकारे कायदेशीर ट्रेडींग असणार नाहीत. आपल्या देशात सोने, चांदी किंवा मद्य यांना ही कायदेशीर ट्रेडींग मानली जात नाही. या संदर्भातील विधेयकाचा मसुदा सध्या तयार करण्यात येत आहे. नवीन विधेयकात बंदी सारखा शब्द वगळण्यात आला आहे, परंतु तरीही त्यांच्या वापरावर बंदी घालण्याचे उद्दिष्ट आहे.
क्रिप्टोकरन्सी
हे एक डिजिटल चलन असून ते वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरले जाते. या चलनात क्रिप्टोग्राफी वापरली जाते. आपण ते प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो, परंतु यासाठी बँक, एटीएम असे काही नसते. जगातील बऱ्याच देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरली जाते. क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. ते नोटा किंवा नाणी स्वरुपात छापता येत नाही, तरीही त्याला मूल्य आहे.
काही देशांमध्ये क्रिप्टोकरन्सीची स्थिती (क्रिप्टोकरन्सीबाबत वेगवेगळ्या देशांची स्वतःचे कायदे आहेत.)
अमेरिका
क्रिप्टोकरन्सी खरेदी करणे, विक्री करणे किंवा जमा करणे न्यूयॉर्कमध्ये २०१६ पासून कायदेशीर आहे. अद्याप पूर्णपणे ओळखले गेले नसले तरी, बँकांमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे.
चीन
या देशात सुरुवातीला क्रिप्टोकरन्सीचे स्वागत केले, परंतु जून २०२१ मध्ये त्यावर पूर्णपणे बंदी घातली. व्यापार किंवा व्यापार करणार्यांवर कायदेशीर कारवाई देखील सुरू केली आणि चीनमध्ये कार्यरत असलेल्या परकीय चलनावरही बंदी घातली. या निर्णयामुळे ४० टक्के क्रिप्टोकरन्सी बुडाल्या. चीनने आता युआन हे डिजिटल चलन तयार केले आहे.
ब्रिटन
क्रिप्टोकरन्सीसाठी वेगळा कायदा नाही, तर फायनान्शियल कंडक्ट ऑथॉरिटीने क्रिप्टोचे व्यापार आणि देवाणघेवाण करण्यासाठी परवाने जारी करते. तसेच क्रिप्टोच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स श्रेणीचे व्यापार करणाऱ्यांसाठी काही नियम सेट केले आहेत. येथे क्रिप्टोवर इतर कोणत्याही चलनाप्रमाणे कर लावला जातो, तो कंपनी कर नियमांतर्गत येतो. तसेच नफा किंवा तोटा भांडवली नफा कर म्हणून वर्गीकृत केला जातो.
युरोपियन युनियन
बहुतेक युरोपियन देश क्रिप्टोवर सकारात्मक भूमिका घेत आहेत, परंतु ते पूर्णपणे ओळखण्यापूर्वी एक पुरेशी फ्रेमवर्क विकसित करू इच्छित आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये, युरोपियन युनियनने क्रिप्टोच्या नियमनाबाबत काही कायदे लागू केले, त्या अंतर्गत शेअर्स, म्युच्युअल फंड यासारखे आर्थिक पर्याय म्हणून उभे केले गेले.