विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारने कठोर लॉकडाऊन लावले होते. पण आता हळूहळू सारेकाही अनलॉक होत आहे. अश्यात प्रशासनाला सार्वजनिक स्थळांवरील गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड होईल. पण दिल्लीतील एका शालेय विद्यार्थ्याने गर्दी रोखणारे उपकरण (डिव्हाईस) तयार केले असून ते प्रशासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
शालिमार बाग येथील मॉडर्न पब्लिक स्कूलचा विद्यार्थी हितेन याने हे उपकरण तयार केले आहे. हे एक एन्ट्री-एक्झीट उपकरण असल्याचे त्याने म्हटले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने सार्वजनिक स्थळांवर लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. हे डिव्हाईस मॉल, बगिचे, जीम, रेस्टॉरेंट, सामूहिक कार्यक्रम आदी ठिकाणी वापरले जाऊ शकते. यासाठी डिव्हाईसला एन्ट्री व एक्झीट पॉईंटवर लावावे लागेल. त्यानंतर त्या स्थळावर जेवढे लोक येतील किंवा बाहेर पडतील त्यांच्या संख्येची माहिती मिळेल. काही विशिष्ट्य गर्दीच्या ठिकाणांवर लावण्यासाठी हे डिव्हाईस प्रशासनाला फायद्याचे ठरू शकते, असे हितेन म्हणतो.
लोकांची संख्या कळेल
या उपकरणात एकूण व्यक्तींची संख्या सेट करून ठेवण्याचीही सुविधा आहे. उदाहरणार्थ एखाद्या सार्वजनिक स्थळी केवळ ४० लोकांना परवानगी असेल तर उपकरणात ४० आकडा सेट करून ठेवता येतो. त्यानंतर जर गर्दी वाढली तर उपकरणात प्रवेश निषिद्द म्हणून लिहून येते व लाईट लागून सायरन वाजू लागतो. अर्थात यात आधीपासून आत असलेले काही लोक बाहेर पडले तर नव्या लोकांना आत जाण्याची परवानगी मिळते.
हितेनला व्हायचेच शास्त्रज्ञ
हितेनला शास्त्रज्ञ व्हायचे असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ समाजासाठी उपयुक्त ठरतील अश्या उपकरणांचा शोध लावण्यात जातो. त्याने आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि मित्रांना दिले आहे.