नाशिक : दुचाकीस्वार तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदाराने सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी एम.एम.गादीया यांनी हा निर्णय दिला. प्रसाद सुरेश आहेर (२४ रा.आनंदवली कॉलनी,येवलेकर मळा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२७ नोव्हेंबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. टिळकवाडीतील २० वर्षीय पीडित तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पीडिता आपल्या प्लेझर या दुचाकीवरुन कॉलेजरोडवरुन आपल्या घराकडे जात असतांना बस्ते हॉस्पिटल समोर पाठीमागून आरोपीने मोपेडला खेटून दुचाकी चालविली. यावेळी पीडितेने दुचाकी लावून त्यास जाब विचारला असता अंगावर धावून येत आरोपीने शिवीगाळ करीत विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक सरिता जाधव यांनी करून आरोपीविरूध्द न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोप पत्र सादर केले होते. सरकारतर्फे या खटल्याचे कामकाज अॅड.फिरोज शेख यांनी पाहिले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदाराने सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.