नाशिक : घरात घुसून धुडघूस घालणारे दोन जण गजाआड, दोन जण फरार
नाशिक : घरात घुसून धुडघूस घालणा-या टोळक्यातील दोघांना बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले आहे. ही घटना चेहडी पंपीग येथील संगमेश्वर भागात घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप शिंदे उर्फ हुसळय़ा (रा.अरिंगळे मळा,एकलहरा रोड) व रोशन पोपट सोनवणे (रा.रोकडोबावाडी,देवळाली गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून सागर कोकणे आणि प्रशांत जाधव नामक त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी भारती विनोद बायस (रा.गायत्रीनिवास,संगमेश्वर नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत बायस यांच्या मुलाचे परिचीत असून त्यांच्यात आपआपसात वाद झाला होता. या वादातूनच संशयीतांनी शनिवारी (दि.५) बायस यांच्या घरावर हल्ला केला. लोखंडी रॉड व धारदार कोयता घेवून आलेल्या संतप्त टोळक्याने दरवाजा तोडून बळजबरीने घरात प्रवेश करीत धुडघूस घातला होता. कुटूंबियास शिवीगाळ करीत गृहपयोगी वस्तू अस्ताव्यस्त फेकून दिल्या होत्या. तसेच जातांना पोलीसात गेल्यास बघून घेवू अशी धमकी दिली होती. पोलीसांनी चौघांपैकी दोघांना हुडकून काढले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.
…………
दोन घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास
नाशिक : शहरातील वेगवेगळय़ा भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. या घरफोड्यांमधील एक चोरी भरदिवसा झाली आहे. याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मानगर येथील किशोर वासुदेवराव ठाकरे (रा.दत्त श्री अपा.रिव्हेरा हॉटेल जवळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ठाकरे कुटुंबिय शुक्रवारी (दि.४) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील ९ हजाराची रोकड आणि चांदीच्या मुर्त्या,दोन डझन ग्लास आणि पानदान असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत. उंटवाडी भागातील कालिकानगर भागात घडली. राजेंद्र विठ्ठल कासोदेकर (रा.भाग्योदय अपा.जवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. कासोदेकर यांच्या मुलाचे लग्न त्र्यंबकरोडवरील दामोदर पॅलेस होते. त्यानिमित्त कासोदेकर कुटूंबिय शुक्रवारी (दि.४) रात्री दामोदर पॅलेस येथे गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे व टेरेसच्या दरवाजाचे लॉक तोडून लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ४० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.