नाशिक – चेहेडी पंपिंग येथील भगवा चौक येथे भारती बयास यांच्या घरात घुसून पाच गुंडांनी तोडफोड केली. याप्रकरणी भारती विनोद बायस व मुलगा प्रशांत बायस यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, रात्री दोन वाजेच्या सुमारास हे गुंड आम्ही पोलिस आहोत असे सांगत दार उघडा असे सांगत होते. खिडकीमधून बाहेर बघितले असता काही गुंड हातात तलवार, कोयते घेऊन दाराबाहेर उभे होते. दार उघडले नाही म्हणून सागर कोकणे, प्रशांत जाधव आदींनी दरवाजा पूर्णपणे तोडून घरात प्रवेश केला. टीव्ही, कपाट आदी सर्व सामानाची तोडफोड केली. तसेच परिसरातील इतर घरांच्या काचा आणि एका रिक्षाचीही तोडफोड करून पळून गेले. या तक्रारीवरुन नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गुन्हेगार तडीपार असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गद्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक काकड करीत आहे.