नाशिक : फरार झालेला आजारी कैदी अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलीसांच्या हाती लागला आहे. बाथरुमच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला होता. जिल्हा रूग्णालयातील बाथरूममध्ये तो मिळून आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी तो जिल्हा रूग्णालयातील एका वार्डाच्या बाथरूममध्ये मिळून आला. साफसफाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचा-यांना तो बेडीसह लपलेल्या अवस्थेत दिसला. कर्मचा-यांनी त्यास पकडून पोलीसांच्या स्वाधिन केले. नितीन सुभाष पवार असे पसार झालेल्या संशयीत कैद्याचे नाव आहे. खून आणि बलात्काराच्या गुह्यात तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. दोन दिवसापूर्वी आजारपणामुळे त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रिझन वार्ड मध्ये उपचार घेत असतांना त्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास बेडीसह धुम ठोकली होती. प्रिझन वार्डात सात कैद्यावर उपचार सुरू असल्याने कैदी पार्टीवर मोठ्या प्रमाणात कर्मचा-याचा ताफा तैणात आहे. त्यातील दोघांना बाथरूमला जावून येतो असे सांगून नितीन पवार प्रिझन वार्ड बाहेर पडला होता. बराच वेळ उलटूनही तो न परतल्याने जेल कर्मचाºयांची धावपळ उडाली. सरकारवाडा पोलीसांच्या मदतीने रात्रभर शोध मोहिम हाती घेवूनही तो हाती लागला नाही. मध्यरात्री जलरक्षक नागनाथ माहोरे यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.