नाशिक – नायलॉन मांजा विक्रेत्यांवर बुधवारी शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून
दोघा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले. मखमलाबाद रोड व गंगापूर रोड वरील राठी आमराई परिसरात या दोन ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मखमलाबाद रोड येथील शांतीनगरला प्रतिबंध असलेला नायलॉन मांजा विक्रीवरुन गौरव रमेश फरताळे (वय ३२,तांबेमळा, शांतीनगर ) या विक्रेत्याविरुध्द म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंध असलेला मोनो काईट कंपनीचा नायलॉन मांजा विक्रीसाठी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. गंगापूर रोड वरील राठी आमराई परिसरात प्रथमेश प्रफूल्ल तांबोळी (वय १९, ओम श्रीसाई अपार्टमेंट गंगापूर रोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री साई अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भिंतीच्या आडोशाला काचेचे कोटींग असलेले प्रतिबंधित मांजाचे १९ हजार ६०० रुपयांचे २८ गट्टू विक्रीसाठी असल्याने ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.