नाशिक – भूमाफिया टोळीतील संशयित बाळासाहेब बारकू कोल्हे याला सातपूर पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. न्यायालयाने गेल्या मंगळवारी (दि.७) जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली होती. कोल्हे याच्याविरुद्ध पुरावा मिळाल्याने सातपूर पोलिसांनी पुन्हा त्यास सोमवारी अटक केली.जागेच्या वादातून गेल्या फेब्रुवारीमध्ये वृद्ध भूधारक रमेश मंडलिक (७०) यांचा खून केल्याप्रकरणी भूमाफियांची टोळी पोलिसांनी गजाआड केली होती. त्यात कोल्हे यांचा समावेश आहे. टोळीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करत आर्थिक रसद पुरविण्याचा ठपका संशयित कोल्हेविरुद्ध ठेवण्यात आला आहे
आनंदवली येथे मंडलिक यांच्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे २२ संशयितांची टोळी गजाआड केली आहे. या भूमाफियांच्या टोळीचा मास्टरमाइन्ड रम्मी राजपूतलाही पोलिसांनी अटक केली. गेल्या मंगळवारी न्यायालयाने जिम्मी राजपुत व कोल्हे यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे कारागृहातून कोल्हे यांची सुटका झाली होती. यानंतर सातपूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दाखल जमीन फसवणुकीच्या एका गुन्ह्यात पुन्हा अटक केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेतील अव्वल कारकून राहुल काळे (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोल्हेविरुद्ध पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मूळ जमीनमालकाच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार करत शासनाची व जमीन मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात सातपूर पोलिसांना कोल्हे हवा होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत त्याच्याविरुद्ध पुरावे पोलिसांच्या हाती लागले. यामुळे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी कोल्हे यास सोमवारी पुन्हा अटक केली.