नाशिक – शहरातील उंटवाडी रोड येथील बालसुधारगृहातून १६ वर्षीय मुलगा हात धुण्यासाठी जातो असे सांगत पळून गेल्याची घटना घडली. याप्रकणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालसुधारगृह येथून एक १६ वर्षीय मुलगा गुरुवारी (दि ०९) रात्री बालसुधारगृहात सर्व मुलांचे जेवण झाले. यानंतर हात व ताट धुण्यास हा मुलगा बाहेर जातो असे सांगून गेला. यानंतर तो परतलाच नाही. दरम्यान, ही घटना बालसुधार गृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो बालसुधारगृहात मिळून आला नाही. यानंतर बालसुधार गृहाचे व्यवस्थापक संजय गाडेकर यांनी मुंबई नाका पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहक, पोलीस उपनिरीक्षक अहिरे व सहायक पोलीस निरीक्षक मन्सुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक मन्सुरी पुढील तपास करत आहेत.