नाशिक – फाळके स्मारकात साहित्याची तोडफोड; संगीत कारंजाची इलेक्ट्रीक केबल चोरीला
नाशिक : फाळके स्मारकात चोरट्यांनी साहित्याची तोडफोड करुन संगीत कारंजाची १२५ मिटर लांबीची इलेक्ट्रीक केबल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर लक्ष्मण शिंदे (रा.आडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या फाळके स्मारक कारोना महामारीपासून बंद अवस्थेत आहे. मनपाकडून ते सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच तेथे चोरटे धुमाकूळ घालत आहेत. ८ एप्रिल ते २३ मे दरम्यान चोरट्यांनी इलेक्ट्रीक पॅनलला जोडलेल्या केबल्स आणि साहित्य कापून नेण्याचा प्रयत्न केला तर काही साहित्याची मोडतोड करून सुमारे ४७ हजार ५०० रूपयांचे नुकसान केले आहे. स्मारकात पर्यटकांच्या करमणुकीसाठी असलेल्या संगीत कारंजाची सुमारे २९ हजार ८७५ रूपये किमतीची १२५ मिटर लांबीची इलेक्ट्रीक वायर भामट्यांनी कापून नेली आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
तडीपारास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक : राजा नर्सरी भागात सापळा रचून तडीपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. संतोष मानसिंग ढमाळ (४८ रा.अहिल्याबाई होळकर चौक,सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडीपाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढमाळ याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलिसांनी त्यास शहर आणि जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांना मंगळवारी सायंकाळी तो त्र्यंबकरोडवरील अमृत गार्डन हॉटेल भागात आला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राजा नर्सरी भागात सापळा लावून त्यास जेरबंद केले असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी गोकूळ कासार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक खरपडे करीत आहेत.