शेजा-याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली
नाशिक : फुलेनगर येथील गल्ली नं.४ मध्ये किरकोळ भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजा-याच्या डोक्यात एकाने बिअरची बाटली फोडली त्यात शेजारचा जखमी झाला आहे. सिध्दू काशिनाथ शिंदे (रा.घर नं.८४,गल्ली नं.४ भराडवाडी) असे जखमीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खंडू शिंदे (रा.सदर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व संशयित एकमेकांचे शेजारी असून, घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीवर थुंकल्याच्या वादातून ही घटना घडली. अशोक शिंदे घरात नसतांना संशयित व त्याच्या कुटूंबियांनी तक्रारदार यांच्या कुटुंबियांना दुचाकीवर का थुंकतात यावरून शिवीगाळ केली होती. त्यामुळे गुरूवारी रात्री अशोक शिंदे संशयितांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता ही घटना घडली. संशयिताचे कुटूंबिय शिंदे यांच्याशी वाद घालत असतांना संतप्त सिध्दूने घरात पडलेली बिअरची रिकामी बाटली अशोक यांच्या डोक्यावर फोडली. एवढ्यावरच न थांबता संशयिताने फुटलेल्या बाटलीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत फुटलेली अर्धवट बाटली दंडावर आणि पाठीवर मारल्याने अशोक शिंदे जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : ३२ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली आहे. प्रकाश विठ्ठल शिंदे (रा.सुरज रेसि.पाण्याच्या टाकीजवळ) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश शिंदे यांनी सोमवारी (दि.२३) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.