७० हजार रूपयाची सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडली
नाशिक : पाथर्डी शिवारातील सोनवणे मळा भागात महिलेच्या गळयातील सुमारे ७० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. या चोरीप्रकरणी स्वाती सचिन साखला (रा.अक्षर कॉलनी,सोनवणे मळा) यांनी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती साखला व त्यांची जेठाणी सोमवारी रात्री जेवण आटोपून परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. महामार्गाकडून दोन्ही महिला हॉटेल सेवन हेव्हन समोरून पायी जात असतांना डॉ.सावकार यांच्या बंगल्यासमोर पाठीमागून आलेल्या एका तरूणाने साखला यांच्या गळयातील सुमारे ७० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडून जवळच डबलसीट उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
सुमनचंद्र लॉन्स भागात घरफोडी; ३२ हजाराच्या ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३२ हजाराच्या ऐवज लंपास केला असून यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. सुमनचंद्र लॉन्स भागात भरदिवसा ही घरफोडी झाली. या घरफोडी प्रकरणी वसीम युनूस शेख (रा.अलहजारी गार्डन अपा.रॉयलकॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख कुटूंबिय शनिवारी (दि.२१) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातून सोन्याचे लॉकेट,दहा अंगठ्या,चांदीच्या साखळया व पट्टी असा सुमारे ३२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.