नाशिक – जळगाव येथील महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले
नाशिक : नाशिक – पुणे मार्गावरील दत्तमंदिर बस स्टॉप भागात विवाहसोहळा आटोपून बसथांब्याकडे पायी जाणा-या जळगाव येथील महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली राजू चौधरी (रा. रावेर जि.जळगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौधरी शनिवारी (दि.२१) नातेवाईकांच्या विवाहसोहळय़ा निमित्त शहरात आल्या होत्या. नाशिक पुणे मार्गावरील उत्सव गार्डन लॉन्स मधून त्या गोरस मुहूर्तावरील लग्न आटोपून परतीच्या प्रवासासाठी बसथांब्याकडे पायी जात असतांना ही घटना घडली. उत्सव गार्डन लॉन्स कडून त्या दत्तमंदिर बस थांब्याच्या दिशेने जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ७५ हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.
घरफोडीत चार लाखाचा ऐवज लंपास
नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी चार लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना बॉईज टाऊन स्कूल भागातील बहुमजली इमारतीत घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे,चांदीचे देव व वस्तू तसेच दोन मोबाईलचा चोरुन नेले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष अशोक बडवे (रा.आशिर्वाद हाईटस,आनंदवन कॉलनी,येवलेकरमळा) यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. बडवे यांच्या पाचव्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या टेरेसच्या दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे, मोबाईल व लॅपटॉप असा सुमारे चार लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना २० ते २२ मे दरम्यान घडली. अधिक तपास उपनिरीक्षक एम.डी.पाटील करीत आहेत.