इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात हुंडा घेण्याची अमानुष प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यातूनच महिलांवर अत्याचार होतात आणि काहीवेळा हुंडाबळी देखील प्रकार घडतात. तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला हुंड्याच्या लालसेने पतीने जबरदस्तीने अॅसिड पाजले. त्यात पत्नीचा मृत्यू झाल्यावर पती घरातून पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारणी मंडळाच्या राजपेठ थांडा येथे ही भयानक घटना घडली. आरोपी तरुण याचा चार वर्षांपूर्वी कल्याणीसोबत विवाह झाला होता. तीन महिन्यांपूर्वी कल्याणी गरोदर राहिल्यानंतर तरुणाने तिचा छळ सुरू केला. त्याने आई-वडिलांकडे जास्त पैसे आणि हुंडा मागायला सुरुवात केली.
याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. तरुणाने कल्याणीला अॅसिड पाजण्यास भाग पाडले. कल्याणीची प्रकृती ढासळू लागल्यावर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात नेले. त्यातच तिचे निधन झाले.
यानंतर कल्याणीच्या नातेवाईकांनी आरोपी तरुणवर हुंड्यासाठी तिचा छळ करून तिला अॅसिड पिण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.