मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने विराट कोहलीच्या जागी सलामी फलंदाज रोहित शर्माला टी-२० नंतर एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. कोहलीने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच टी-२० चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोहलीची इच्छा नसतानाही बीसीसीआयने त्याला एकदिवसीय सामन्यांमधून कर्णधारपदावरूनही हटविले. विराट आता फक्त कसोटी सामन्यांमध्येच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर फॅन्सचा संताप पहायला मिळाला आहे. परंतु बीसीसीआयच्या या निर्णयामुळे विराटला खुप सारे फायदे होणार असल्याची बाब पुढे आली आहे.
क्रिकेट खेळताना तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये (एकदिवसीय, टी२० आणि कसोटी) कर्णधारपद भूषविणे कठीण कामांपैकी एक असते. केवळ एकाच प्रकारच्या सामन्यामध्ये कर्णधार राहिल्याने विराटवर अतिरिक्त दबाव राहणार नाही. म्हणजेच, त्याला कसोटी सामन्यांवरच चांगले लक्ष केंद्रित करता येईल, हे पहिला आणि मोठा फायदा आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विराट हा फलंदाजी करताना मोठ्या धावा करु शकलेला नाही. अनेकदा तो संघर्ष करताना दिसला आहे. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये विराट दोन वर्षात एकही शतक करू शकला नाही. हे प्रथमच पाहायला मिळाले आहे. कर्णधारपदाचा भार उतरल्यानंतर तो आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकणार आहे. ही सर्वात महत्त्वाची आणि त्याच्यासाठी फायद्याची बाब आहे. याद्वारे तो फलंदाजीत आपले कर्तृत्व अधिक सिद्ध करेल आणि अनेक विक्रम नावावर करु शकेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या आयुष्यात अनेक आव्हाने असतात. कोरोना महामारी आणि जीवसुरक्षा प्रणालीत राहिल्याने यामध्ये आणखी भर पडली आहे. त्यामुळेच क्रिकेटपटू शारिरीक आणि मानसिकरित्या थकत आहेत. त्यांना कुटुंबीयांना अधिक वेळ देता येत नाही. फक्त एका फॉरमॅटमध्ये नेतृत्व केल्यास विराटला आराम मिळेल. त्यामुळे तो पहिल्यापेक्षा कुटुंबीयांना अधिक वेळ देऊ शकेल. परिणामी, त्याची पत्नी अनुष्का आणि कन्या वामिका यांच्यासोबत विराट राहू शकणार आहे. यातूनच त्याचा मानसिक तणाव दूर होणे आणि पुढील खेळांवर अधिक लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे. म्हणजे, कुटुंबाला वेळ देणे आणि तणाव व थकवा दूर करणे यासाठीही त्याला फायदा होणार आहे.
विजयात विराटच सरस
विराटची कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यातील विजयाची टक्केवारी ७०.४३ राहिली आहे. दहा सामन्यात भारताचा कर्णधार राहिलेल्या कोणत्याही खेळाडूपेक्षा ही विजयाची सर्वोत्तम टक्केवारी मानली जात आहे. भारतीय संघासाठी विराटने ९५ सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. त्यापैकी ६५ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. भारतासाठी कोहलीपेक्षा अधिक सामने महेंद्र सिंह धोनी (११०), मोहम्मद अझरुद्दीन (९०) आणि सौरव गांगुली (७६) यांनी जिंकले आहेत. कोहली नेतृत्व करताना भारताने १९ पैकी १५ द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. यामध्ये दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्टइंडिजमधील विजयाचा समावेश आहे.