मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियोमक आयोग (बीसीसीआय)च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. त्याचवेळी ऋषभ पंतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या बरे होण्याबद्दल सांगितले आहे.
कार अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. वैद्यकीय पथकाने चांगली बातमी दिली आहे. सर्व काही ठीक झाले तर ऋषभ पंतला या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ऋषभ पंतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. ऋषभने लिहिले की, माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. तुमच्या सर्व प्रेमाने आणि आशीर्वादाने मी लवकर बरा होत आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि मी जलद बरा होत आहे. तुमच्या प्रेमाने मला वाईट काळात बळ दिले. सर्वांना धन्यवाद.”
गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी सकाळी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. तो दिल्लीहून रुरकी येथे घरी जात होता. त्यावेळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. त्यांला प्रथम डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तेथून एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले.
Cricketer Rishabh Pant Health Update Insta Post