महाराष्ट्राला उपविजेतेपद
सूरत – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात नाशिकच्या माया सोनवणेने रेल्वे विरुद्ध २ बळी घेतले. सूरत येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. अंतिम सामना रेल्वेने ७ गडी राखून जिंकला. रेल्वेच्या बाद झालेल्या तीन पैकी दोन बळी मायाचे अंतिम सामन्यात तिने ३.१ षटकांत २२ धावा देत २ गडी बाद करताना ९ निर्धाव चेंडू टाकले. याआधी पुदुचेरी येथे झालेल्या साखळी सामन्यात देखील प्रभावी कामगिरी करताना माया सोनवणेने आंध्र व केरळ विरुद्ध ४/४ बळी घेतले होते. अशा प्रकारे आपल्या प्रभावी लेग स्पिन गोलंदाजीने मायाने या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी स्पर्धेत एकूण ११ बळी घेत आपली छाप उमटविली .
लालभाई स्टेडीयम, सूरत येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना स्मृति मानधना च्या ८४ धावांच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १६० धावा केल्या. उत्तरादाखल रेल्वे ने एस मेघना व डी हेमलताच्या अर्धशतकांमुळे , १८.१ षटकांत ३ बाद १६५ धावा करून, ७ गडी राखून वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माया सोनवणे चे खास अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.