मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलीच्या मृत्यूसाठी कोविशिल्डला जबाबदार धरणाऱ्या दिलीप लुनावत नावाच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि इतरांकडून उत्तर मागितले आहे. लुनावत यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याविरोधातही ही याचिका दाखल केली आहे. बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि भारतातील औषध नियंत्रक यांच्याशी भागीदारी केली होती.
न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने २६ ऑगस्ट रोजी याचिकेतील सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. या प्रकरणाची सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने दावा केला आहे की त्यांची मुलगी स्नेहल लुनावत ही वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. तिला २८ जानेवारी २०२१ रोजी नाशिकमधील तिच्या महाविद्यालयात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे तयार केलेली अँटी-कोरोनाव्हायरस कोविशिल्ड लस घेण्यास भाग पाडण्यात आले. ती आरोग्य कर्मचारी असल्याने प्राधान्याने ही लस देण्यात आली.
मात्र, काही दिवसांनंतर स्नेहलला तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्या आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला आहे. तिच्यावर उपचार सुरु असतानाच स्नेहलचा १ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला. या सगळ्याला लसच कारणीभूत ठरल्याचा दावा दीलिप लुनावत यांनी केला आहे. ही याचिका केंद्र सरकारच्या अॅडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन (AEFI) समितीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी सादर केलेल्या अहवालावर अवलंबून होती, ज्याने कथितपणे कबूल केले की त्यांच्या मुलीचा मृत्यू कोव्हीशिल्डच्या दुष्परिणामांमुळे झाला आहे. याचिकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून १००० कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणातील पुढील बाजू समोर येणार आहेत.
Covishield Vaccine Girl Death High Court Petition
Legal Corona Serum Institute Compensation Plea