नवी दिल्ली – कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली असताना आता अन्नधान्याची कमतरता पडू नये म्हणून अनेक देश आयात करण्यावर भर देत आहे. त्याचा विकसनशील देशांवर अधिकच भार पडणार आहे. एकीकडे महागाई आणि दुसरीकडे कुपोषणाचा दर वाढण्याची चिंता संयुक्त राष्ट्र संघाला सतावत आहे.
जगभरातील अन्नधान्याच्या आयातीवर येणारा खर्च विक्रमी स्तरावर वाढण्याची शक्यता संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संस्थेने (फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन) व्यक्त केली आहे. कोरोनाने आधीच अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याच्या पृष्ठभूमीवर अनेक गरीब देशांवर दबाव वाढणार आहे. इंधन दरवाढीमुळे शेतकर्यांच्या उत्पादनाचा खर्च वाढत आहे. परिणामी गरीब देशांमधील महागाई अनेक दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. जगभरात महागाई वाढल्याची समस्या नसून, गरीब देश हा कळीचा मुद्दा आहे, असे एफएओच्या व्यापार आणि बाजार विभागाचे उपसंचालक जोसेफ श्मिडहुबर यांनी सांगितले.
कुपोषण वाढण्यावर चिंता
एफएओने आपल्या द्ववार्षिक अहवालात म्हटले की, वाहतुकीच्या खर्चासह जगभरात अन्नधान्य आयातीचा खर्च यावर्षी १.७१५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचल्याचा अंदाज आहे. २०२० मध्ये हा खर्च १.५३० ट्रिलियन डॉलर इतका होता. म्हणजेच हा आकडा १२ टक्के अधिक आहे. जगभरात कुपोषित बालकांची आकडेवारी वाढत असल्याबद्दल यापूर्वी आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थांनी इशारा दिलेला आहे. महामारीमुळे येमन आणि नायजेरियासारख्या देशांमध्ये अन्नसुरक्षा वाढली आहे. एफएओचा मासिक अन्न मूल्य निर्देशांक मेमध्ये १० वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. त्यात धान्य, वनस्पती तेल आणि साखरेचे दर वाढलेले आहेत.
अन्नधान्यांचे दर पूर्वीपेक्षा अधिक
एफएओच्या माहितीनुसार, अन्न आयातीच्या किमतीचा वेगळा निर्देशांक आहे. त्यामध्ये माल वाहतुकीच्या किमतीचाही समावेश आहे. तोसुद्धा यावर्षी मार्चमध्ये एका विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. २००६-२००८ आणि २०१०-२०१२ मध्ये गेल्या अन्नधान्याच्या दरवाढीच्या स्तरालाही पार केले आहे. एफएओच्या अंदाजानुसार, आगामी २०२१-२२ मध्ये चीनमध्ये मक्याची आयात वाढून २४ मिलियन टन होणार आहे. याचा अर्थ चीन २०२०-२१ मध्ये चीन मक्याची आयात चारपट करून २२ मिलियन टन करण्याची शक्यता आहे. जगभरातील धान्य आयातीत चीन अग्रस्थानी असेल.