नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या मृत्यूंबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनासंदर्भातील त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, भारतात कोरोनामुळे तब्बल ४७ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने ही आकडेवारी फेटाळून लावली आहे.
WHO च्या अहवालानुसार, १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात भारतामध्ये तब्बल ४७ लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीमुळे जगभरात १५ दशलक्षाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण जगाच्या मृत्यूंपैकी भारताचा आकडा हा एक तृतीयांश आहे. जगभरातील मृतांची संख्या अचूकपणे मोजली गेली नाही. भारतात जेवढे लोक मरण पावले आहेत त्यापेक्षा जवळपास १० पट जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
WHO ने कशा पद्धतीने आकडेवारी प्रसिद्ध केली याबाबत तज्ज्ञ सांगतात की, ऍक्सेस डेथ अशी ही पद्धत आहे. त्यात साथीच्या रोगाशी झुंजणाऱ्या क्षेत्राच्या मृत्यू दराच्या आधारे, किती लोकांचा मृत्यू झाला असेल याचा अंदाज लावला जातो. WHOचे महासंचालक म्हणाले की, हा आकडा केवळ महामारीच्या प्रभावाबद्दलच सांगत नाही तर देशांनी यापासून धडा घेतला पाहिजे की त्यांनी आपल्या आरोग्य प्रणाली सुधारल्या पाहिजेत. संकट काळात उत्तम आरोग्य सुविधाच मानवतेला वाचवू शकतात.
सरकारी आकडा किती
१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात भारतामध्ये केवळ ५ लाख २० हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. मात्र, त्याच काळात तब्बल ४७ लाख जणांचा बळी गेल्याचे WHOचे म्हणणे आहे. ऑगस्ट २०२० पर्यंत भारतात कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे मृत्यू कमी होत होते. याच काळात (कडक लॉकडाऊन) ६२ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे WHOच्या अहवालात म्हटले आहे. सप्टेंबरपासून मृतांची संख्या झपाट्याने वाढली आणि अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेने हाहाकार माजवला. एप्रिल, मे आणि जूनमध्ये ही लाट शिगेला पोहोचली होती आणि तोपर्यंत २७ लाख लोकांचा मृत्यू झाला होता, असेही अहवालात नमूद केले आहे.