नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने पार्क केलेली दुचाकी पळवून नेणा-या दोघा चोरट्यांना दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिपक अर्जुन पैठणे (३१ रा.लहवित ता.जि.नाशिक) व धनंजय विजय पाटील (३० रा.इटाणे ता.साक्री जि.धुळे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दीड महिन्यापूर्वी ही घटना निमाणी बसस्थानक परिसरात घडली होती. धात्रक फाटा भागातील शिवाजी गंभीरे (रा.पत्रवाडी,बळीराजनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. गंभीरे गेल्या १ नोव्हेंबर रोजी निमाणी भागात आले होते. बसस्थानका समोरील आयुष हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली मॅस्ट्रो मोपेड एमएच १५ ईसी ९५५४ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हया तपास हवालदार अनिल सोर यांनी केला. पोलिसांनी दोघांना अटक करीत पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हा खटला हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट ८ च्या न्या. प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात चालला.
सरकारतर्फे अॅड.जी.आर.बोरसे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांची दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून दोघा आरोपींना दोन महिने साधा कारावास व प्रत्येकी २०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.