नवी दिल्ली – कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनबद्दल आधीपासून ज्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या, त्या सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हेरिएंट खूप वेगाने पसरत आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ५० टक्के ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये या व्हेरिएंटचा सामुहिक संसर्ग सुरू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही देशांकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.
अमेरिकेत वेगाने फैलाव
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रा (सीडीसी) चे संचालक रोशेल वालेंस्की म्हणाले, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कमीत कमी १५ राज्यांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. यामध्ये कॅलिफोर्निया, कोलोराडो, कनेक्टिकट, हवाई, मेरीलँड, मॅसेचुसेट्स, मिनेसोटा, मिसोरी, नेबरास्का, न्यूजर्सी, न्यूयॉर्क, पेंसिल्वेनिया, उटाह, वॉशिंग्टन आणि विस्कांसिन या शहरांचा समावेश आहे. ते म्हणाले, की या व्हेरिएंटचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. परंतु अजूनही डेल्टा व्हेरिएंटची नागरिकांना सर्वाधिक लागण होत आहे. एका दिवसात ९० हजार ते एक लाख नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये ९९.९ टक्के डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आहेत.
ओमिक्रॉन अमेरिकेत सर्वप्रथम आढळला?
न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी मॅरी बॅसेट म्हणाल्या, ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. सामुहिक संसर्ग होण्याची शक्यता आता सत्यात उतरत आहे. अमेरिकेत दुसर्या देशांमधून येणार्या सर्व प्रवाशांचे कोरोना निगेटिव्ह अहवाल एका दिवसापूर्वीच देण्यास अनिवार्य केले आहे.
अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट दक्षिण अफ्रिकेत आढळण्यापूर्वी अमेरिकेत पोहोचला होता. दक्षिण अफ्रिकेत सर्वात प्रथम २४ नोव्हेंबरला ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याची पुष्टी मिळाली होती. २६ नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ओमिक्रॉनचे नाव दिले होते. त्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान आयोजित जापानी अॅनिमेशन शोमध्ये सहभागी झालेला ३० वर्षांचा पीटर मॅकगिन याला २३ नोव्हेंबरला कोरोनाची बाधा झाली होती. या शो मध्ये ५० हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. दहा दिवसांनंतर जेव्हा मॅकगिनचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल आल्यावर तो ओमिक्रॉनने बाधित झाल्याला दुजोरा मिळाला. याचाच अर्थ २४ नोव्हेंबरपूर्वीच ओमिक्रॉन अमेरिकेत पोहोचला होता.
सिडनीमध्ये १५ बाधित
ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर सिडनीमध्ये पाच जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. न्यू साउथ वेल्सचे मुख्य आरोग्य अधिकारी कॅरी चँट यांनी स्थानिक पातळीवर ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याची पुष्टी केली आहे. आतापर्यंत १५ रुग्ण आढळले आहेत. अशा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ब्रिटनमध्ये ५० टक्के वाढ
ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आणखी ८६ रुग्ण आढळले आहेत. आता ब्रिटनमध्ये एकूण २४६ रुग्ण झाल्याचा दुजोरा ब्रिटिश आरोग्य विभागाने दिला आहे. शनिवारपर्यंत देशात या व्हेरिएंटचे १६० रुग्ण आढळले होते. यूकेच्या आरोग्य सुरक्षा केंद्राच्या माहितीनुसार रुग्णांमध्ये ५० टक्क्यांची वाढ झाली आहे.