India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तब्बल बाराशे वर्षांनंतरही आदिवासी भागात अंधश्रद्धा निर्मूलन का झाले नाही? नेमका दोष कुणाचा? ही आहेत कारणे…

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in विशेष लेख
0

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्यथा आदिवासींच्या – भाग १३
“अंधश्रद्धांच्या विळख्यात आदिवासी गावं”

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महाराष्ट्रात अकराव्या शतकापासून चालू आहे. अश्रीचक्रधर – ज्ञानदेवांपासून, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि अगदी अलीकडील गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांचा प्रयत्न केला आहे. दुर्दैवाने दुर्गम भागात अजूनही हे सुधारणावादी विचार पोहोचले नाहीत.

श्री. प्रमोद गायकवाड
अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम
आणि आदिवासी भागातील समस्यांचे अभ्यासक
मो. 9422769364

मध्यंतरी मराठवाड्यातल्या एका आदिवासीबहुल तालुक्यातील एका बालरोगतज्ज्ञांनी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. मन विदीर्ण करणारा तो व्हिडिओ होता. त्यांच्याकडे एका लहान मुलाला घेऊन त्याची आई आली होती. डॉक्टर त्याला तपासायला लागले तर त्याच्या पोटावर चटके दिल्याच्या खुणा होत्या. मूल कळवळत होतं ते!
‘‘हे काय?’’ असे विचारल्यावर त्या बाळाचे पालक म्हणाले,
‘‘तापलं होतं पोरगं, देवाचा कोप हाये, चटके देऊन बरं हुईल असं भगतानं सांगितलं, म्हणून…’’
ते ऐकून डॉक्टर संतापले. भगताने सांगितले म्हणून ताप आलेल्या पोटच्या गोळ्याला चटके देणे, ही किती टोकाची अमानुष पद्धत! डॉक्टरांनी या प्रकरणामुळे बाळाच्या पालकांना झापले आणि त्यांनी बाळावर योग्य उपचार सुरू केले. पण त्या बाळाच्या पोटावरील चटक्यांचे डाग काही त्यांच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हते. असे अंधश्रद्धेच्या जोखडामुळे आजारी कुटुंबियांवर अघोरी उपचार करणारे लोक त्रास वाढला की त्यांच्याकडे नियमित येत असतात. मराठवाड्यात आदिवासीबहुल भागात अघोरी भयानक प्रथा पाळल्या जातात.

२०२१ साली आम्ही सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने नाशिक तालुक्यात कुपोषण निर्मूलनाचे काम करत होतो. त्यावेळीची घटना. एका गावात आजारी असलेल्या बालकाला दवाखान्यात न्यावे अशा सूचना त्याच्या पालकांना गावातील आशाताई आणि आमच्या समन्वयकाने केली. पण त्यांचं न ऐकता ते अशिक्षित पालक मुलाला एका भगताकडे घेऊन गेले. त्याने दिलेल्या गंड्या दोर्याचा अर्थातच काही फरक पडला नाही आणि ते मूल सिरिअस झाले. तेंव्हा पालकांना पुन्हा समजावून सरकारी दवाखान्यात जायला भाग पाडले पण तोपर्यंत उशीर झालेला होता. प्रयत्न करूनही मुलाला डॉक्टर वाचवू शकले नाही. केवळ अंधश्रद्धेपायी एका निष्पाप जिवाचा मृत्य झाला….

महाराष्ट्रात सह्याद्री आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये आदिवासी समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. येथील लोक अजूनही शिक्षणापासून काही अंशी लांब आहेत. विज्ञानाधिष्ठित शिक्षण नसल्यामुळे आवर्षण, अतिवर्षण, भकंप, आजारपणे, साथीचे आजार, चक्रीवादळासारखी नैसर्गिक संकटे… या बाबी देवाच्या कोपामुळे होतात, यावर अजूनही येथील आदिवासी समाजाचा समज आहे. त्या समजाला खतपाणी घालतात ते तेथील भोंदू बाबा, भगत, देवऋषी. विज्ञानापासून कोसो दूर असलेले हे लोक मोठ्या प्रमाणात अंधविश्वास, जादूटोणा, नकली बाबा यांच्यावर विश्वास ठेवतात. ‘भीती असते तेथे भुते असतात’ असे म्हणतात त्याप्रमाणे आदिवासी लोकांच्या मनातील भीतीचा बाजार करण्यास देवऋषी, भगत पुढे सरसावतात आणि आदिवासींच्या समस्यांवर अघोरी उपाय सुचवतात. त्यांना ‘काळी जादू’ करायला लावतात. अंधश्रद्धेचा प्रसार करणारी तांत्रिक जादूटोणा करण्यासाठी लोकांकडून हजारो व लाखो रुपये मागून लूट करतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कोंबडी-बकरू कापणे इतकेच नव्हे तर लहान मुलांचा बळी घ्यायला भाग पाडतात.

अलीकडे भारतात विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर अशा अनेक बातम्या वाचायला मिळतात. सातपुड्याच्या पर्वतरांगांत नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील आदिवासी भाग ओळखला जातो तो अंधश्रद्धेमुळेच! गावातील एखाद्या महिलेला डाकीण ठरवून तिच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. डाकीण प्रथा ही महिलांना अत्यंत क्रूर वागवणारी अंधश्रद्धा आहे. या भागात सुशिक्षितांचे प्रमाण कमी अत्यल्प आहे. येथील आदिवासी गावांमधील लोकांच्या मनाचाच ताबा जणू या अंधश्रद्धेने घेतला आहे. त्यामुळे समुपदेशनाचे कितीही प्रयत्न केले तरी बरेचदा ते फोल ठरताना दिसतात. एखाद्या कुटुंबातील सदस्य एकसारख्या आजारांनी आजारी पडले, गावावर काही संकट आले, साथीचा रोग पसरला… असे काहीही घडल्यास गावातील भगताकडे जाऊन त्याला संकटे दूर होण्यासाठी उपाय विचारले जातात. तो भगत हे सगळे गावातील एक महिलाच करत असल्याचे सांगतो. हे सांगताना तो त्या महिलेचे नाव न सांगता तिच्या घराजवळील खाणाखुणा गावकऱ्यांना सांगतो. त्याने सांगितलेल्या खाणाखुणांजवळ घर असलेल्या त्या स्त्रीला अख्खे गाव डाकीण ठरवते. ही स्त्री आर्थिकदृष्ट्या मागास असते त्यावेळी तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिचे शोषण केले जाते. तिला मारहाण केली जाते. संपूर्ण गाव तिला शिवीगाळ करते. कधी तिला गावातून हाकलून देऊन वेशीबाहेर जायला लावते. त्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्रास दिला जातो. ही महिला जिवंतपणीच मरणयातना भोगते. ती ‘आपण डाकीण नाही’ हे ठणकावून सांगते, पण कोणी ऐकून घेत नाही. एका गावात एक महिला रात्री आपल्या मुलीसह धान्य कोठारात भात काढण्याचे काम करत होती. त्याचवेळी काहीजणांनी तिला ‘चेटकीण’ म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. या अमानुष हल्ल्याचे कारण काय तर या मायलेकींनी जादूटोणा करून संपूर्ण गाव उद्ध्वस्त केले, असे हल्लेखोरांचे म्हणणे होते.

आदिवासी भागात अजूनही एखाद्याचे वाईट चिंतून जादूटोणा किंवा करणी केली जाते. आदिवासी वैद्यक विद्या जादू मानते. दुसऱ्याने चेटूक केल्यामुळे, नियम न पाळल्यामुळे, भूतबाधा झाल्याने आजार होतात, असा समज असल्यामुळे बरे होण्यासाठी भगताकडे जाण्यास प्राधान्य दिले जाते. अनेकदा या आजारांवर मात्रा म्हणून आदिवासी जमातींत देवदेवतांपुढे प्राण्यांचे बळी देण्यात येतात. ताप आल्यावर, पोटात दुखत असताना, खरूज झाल्यावर अमानुषपणे तापलेल्या सळईने चटके देणे हे अजूनही चालते. शिक्षणाने माणूस शहाणा होतो, विज्ञाननिष्ठ होतो असे म्हणतात पण अजूनही आदिवासी भागातील काही वसतिगृहांमध्ये भूत असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्यामुळे तिथे अजूनही विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प दिसते.

या अंधश्रद्धांमागील कारण असे सांगितले जाते की, आदिवासी भागात काही वर्षांपूर्वीपर्यंत दवाखाने नव्हते. त्यामुळे एखाद्या देवाला बळी देऊन, विशिष्ट रीतिरिवाज पाळल्याने, तसेच जंगलातल्या झाडपाल्याची औषधांनी आजार बरे होऊ शकतात, या समजुतीवर आदिम जमातीचा ठाम विश्वास बसला आणि तो परंपरेने त्यांच्यात झिरपला. कधी होडी, वाद्ये, भिंती यांवर काढलेल्या आकृत्यांमुळे आपले संरक्षण होते, या आकृत्या चेटकिणींना पळवून लावतात, अशीही समजूत पाहायला मिळते. धर्माच्या माध्यमातून माणूस आदिम काळापासून आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्‍न करतो. देव, राक्षस, भूतात्मे, मृतात्मे व आत्मे हे मानवी जगात हस्तक्षेप करतात, असा आदिवासींचा समज असून त्या अज्ञात शक्ती आणि माणूस यांच्यातील दुवे म्हणजे जादूगार, मांत्रिक, चेटकीण, देवऋषी. या समजुतींमुळे अंधश्रद्धा अस्तित्वात आल्या असे म्हणण्यास वाव आहे. प्रत्येक गावात पुजारी भूमया यांची श्रेणीबद्ध रचना असते,पेरमा, कटीयांग, कोलांग, ओदे. यातील काहींच्या अंगात येते, काही काड्यांनी मोजमाप करतात,काही तांदूळ टाकतात, काही लोखंडी काट्याने मारतात.

ओहदे म्हणजे जादुटोणा करणारा. त्याने केलेल्या करणीमुळे आजारपण येते आणि पुढे मृत्यू ओढवतो, हे सर्व भाकीत पुजारी सांगतात. ओहदेन हा निसर्गातील झाडे, नदी, डोंगर, टेकड्या डोह (गावदेवता) यांना कोप करण्यासाठी प्रवृत्त करतो, अशी अंधश्रद्धा असते. यावर उपचार म्हणून पुजारी दारू मागतात. तसेच कोंबड्या, बोकड, डुकरांचा बळी द्यायला सांगतात. अपघात-आत्महत्या तसेच एखाद्याच्या शेतात चांगले पीक जरी आले तरी त्यामागे अज्ञानाच्या शक्तीबाबत अंधश्रद्धा असते.

या अंधश्रद्धा आदिवासींनी इतकी वर्षे का जोपासल्या, याचेही कारण महत्त्वाचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही अजून एक मोठा भाग असा मागासलेला का असावा, याचे उत्तर शोधताना आपल्या लक्षात येते की स्वातंत्र्य मिळाल्याच्या जल्लोशात इतकी वर्षे भारतातील सरकारचे लक्ष डोंगररांगांतील या समाजाकडे गेलेच नव्हते. त्यांचे लक्ष जेव्हा गेले, तेव्हा गुन्हेगार म्हणूनच गेले. उत्पन्नचा कोणताही स्त्रोत नसलेला आणि कायम गुन्हेगार ठरवलेला फासेपारधी हा समाज जसा बदनाम झाला, तशा इतर आदिम जमातीही! पण त्या भागात एवढ्या अंधश्रद्धा का आहेत, याचा विचार फारसा केला गेला नाही. देश-परदेशातल्या नियतकालिकांच्या रकान्यांमध्ये येथील अंधश्रद्धा आणि बळींच्या कथा चकचकीत पानांवर तपशीलांसह चघळल्या गेल्या; पण एकाही राजकारणी किंवा नोकरशहाने ‘स्वतंत्र भारतात आदिवासींना त्यांचा स्वाभिमान जपत इतर समूहांच्या प्रवाहात आणण्यासाठी काय करावे’ याचा विचार तरी केला का?

आता आता कुठे आदिवासी भागात चांगले शिक्षण द्यायला हवे, उत्तम आरोग्ययंत्रणा उभी करावी, त्यांना विज्ञान म्हणजे काय ते सांगावे, याविषयी मतंमतांतरे येऊ लागली आहेत. भारतातील इतर समाज शिक्षण घेत असताना, प्रगतीची एक एक पायरी चढत असताना तत्कालीन सरकारचे आदिवासींकडे लक्ष गेले होते का? याचे उत्तर नक्कीच ‘नाही’ असे द्यावे लागेल. या भागात सुरुवातीला (काही अपवाद वगळता) औपचारिक शिक्षण सुरू झाले तेव्हा गुरूजी गावात जाण्यास तयार नसल्याने अनेक ठिकाणी ‘शाळा आहे; पण शिक्षण नाही’ हीच अवस्था होती. काही ठिकाणी गुरूजी झाडाखाली निवांत आराम करत असलेले आणि वर्गात एकही विद्यार्थी नाही, अशी परिस्थिती होती. काही वृत्तपत्रांनी आवाज उठवल्यावर तळमळ असलेल्या विज्ञाननिष्ठ शिक्षकांची नेमणूक या शाळांमध्ये झाली.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महाराष्ट्रात अकराव्या शतकापासून चालू आहे. अकराव्या- बाराव्या शतकात श्रीचक्रधर – ज्ञानदेवांपासून आपल्याकडे सुधारणेचे वारे वाहत आहेत.

नामदेव, तुकाराम, एकनाथांच्या संत साहित्यात त्याचे दाखले वाचायला मिळतात. त्यानंतर गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून तर ‘शहाणे करावे सकळजन’चा ध्यासच घेतला होता. त्यानंतर विविध सामाजिक संस्था या कामात उतरल्या. सोशल नेटवर्किंग फोरमसारखी संस्था नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करते आहे पण असे काम विरळाच! नंदूरबारच्या परिसरात डाकीण प्रथेविरूद्ध प्रभावीपणे उपाययोजना करण्याचा संकल्प तेथील पोलिस यंत्रणेने सोडला आहे. त्या भागात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून डाकीण प्रथा निर्मूलन समित्यांची स्थापना करून गावागावातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘हरि-या-अली’सारख्या सामाजिक संस्था त्यांना तेथे मदत करत आहेत.

स्त्रिया अंतराळ संशोधकापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत सर्वत्र झेप घेत असताना, त्यांना जवळपास सर्वच क्षेत्रात समान संधी उपलब्ध होत असताना, शिक्षणात मागे असणारा आदिवासी बांधव अजूनही अंधश्रद्धेत गुरफटला आहे. त्यातील स्त्रीला डाकीण ठरविण्याची प्रथा म्हणजे क्रूरतेचा उच्चांक. या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नंदूरबार पोलिसांनी अक्कलकुवा, तळोदा, मोलगी, म्हसावद या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ‘डाकीण’बाधित गावांतील ग्रामस्थांशी चर्चा करून १६२ डाकीण प्रथा निर्मूलन समित्यास्थापन केल्या. या प्रश्नावर कित्येक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीही काम करत आहे. पण कोणत्याही खासगी संस्था, संघटनांप्रमाणे दुफळी निर्माण होण्याचा शाप या समितीलाही लागला असल्याचा परिणामही दिसतो आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डाकीण ठरविल्या गेलेल्या महिलेला न्याय मिळवून देऊन तिचे पुनर्वसन करण्यापर्यंतचे काम केले. गावात पोलिस पाटील हा महत्त्वाचा दुवा असल्याने डाकीण या विषयावर पोलिस पाटलांची शिबिरे घेण्यात आली. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे प्रयत्न झाले. अंगणवाडी सेविका, शिक्षक, पाडासेवक, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून जनजागृती केली. शेकडो आदिवासी स्त्रियांना डाकीण ठरवणाऱ्या तथाकथित महाराजांची फसवेगिरी समाजासमोर आणली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रसार माध्यमांच्या दबावामुळे २०१३ साली जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्त्वात आला. या कायद्यासाठी तब्बल १६ वर्षे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी संघर्ष केला. या कायद्याचे नामकरण अंधश्रध्दाऐवजी जादूटोणा विरोधी असे करण्यात आले. दिनांक १३ डिसेंबर २०१३ रोजी विधानसभेत तर दिनांक १८ डिसेंबर २०१३ रोजी विधान परिषदेत हा अध्यादेश पास झाला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने २०१६ मध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा केला.

जादूटोणाविरोधी कायद्यानुसार भूत उतरविण्याच्या बहाण्यानं चमत्काराचा प्रयोग करणे, गुप्तधन-भानामती किंवा करणीच्या नावाखालीअमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, भूत पिशाच्चांना आवाहन करणे, कुत्रा, साप, विंचू चावला तर एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्र तंत्र, गंडे दोरे यांचे उपचार करणे, अशा प्रकारांवर त्यात बंदी आहे. मानवी मनाची पकड जशी या अंधश्रद्धांनी घेतली तशीच विज्ञानवादी दृष्टिकोनाने घेतल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाचा उपयोग होऊ शकतो. शिक्षणाबरोबरच पथनाट्य, एकपात्री प्रयोग, मनोरंजनाचे कार्यक्रमही हे काम करू शकतात. ‘भीती असते तिथे भुते असतात’ हे लोकांना सोप्या आणि त्यांच्या भाषेत समजावून सांगायला हवे. कारण रूढी, परंपरा, अंधश्रद्धा व गैरसमजुतींचा समाजस्वास्थावर परिणाम होतो. त्याचा परिणाम आरोग्यव्यवस्थेवरही होतो. एखाद्याला ताप आला तरी तो पूजारी-भगत भुमया यांच्याकडे धाव घेतो. धडगावचे एक कार्यकर्ते सांगतात की, कोविडने उच्चांक गाठलेला असतानाही या भागात लोक भगताकडे जात होते. कारण, परंपरागत सवय आणि अंधश्रद्धा.

आदिवासींचे आरोग्य तसेच जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडे अनेक योजना आहेत. परंतु आधुनिक आरोग्य सोयींपासून हा समाज अजूनही दूरच आहे. दुर्गम भागात कुठल्याही आजारांवर मंत्र-तंत्राने उपचार करतात. मग डॉक्टरकडे येतात. तेव्हा आजार बळावलेला असतो. मग ते पुन्हा भगताकडे जातात. डॉक्टरांनी दिलेली औषधे फेकून देतात. अशाने मरण्याच्या उंबरठ्याशी आजार आल्यावर उपचारांसाठी तालुका किंवा शहरात त्या रुग्णाला आणेपर्यंत आजार खूप हाताबाहेर गेलेला असतो. त्यामुळे पुन्हा भगताने निर्माण केलेल्या चक्रव्यूहात आदिवासी अडकतात आणि अंधश्रद्धेच्या या चक्रव्यूहातून बाहेर पडणे अशक्य होते.

अंधश्रद्धेचा पगडा शिक्षणानेच दूर होऊ शकतो. त्याचबरोबर तो आदिवासींचा विश्वास जिंकूनही दूर होऊ शकतो. हा विश्वास त्या त्या भागात चांगले विवेकी शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्था उभ्या करून, चांगली आरोग्य व्यवस्था उभी करून आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊनच संपादित करता येईल. त्यासाठी हवी, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था! अंधश्रद्धेच्या अघोरी अंधःकाराला दूर सारून विज्ञानाची सुंदर सकाळ तेजोमय करणारी ही व्यवस्था!

प्रमोद गोपाळराव गायकवाड, नाशिक
संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम
[email protected]
Mob – 9422769364
Column Trible Issue Superstition by Pramod Gaikwad


Previous Post

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; या तारखेपासून सुरू होणार

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नववधू आणि पतीचे घोरणे

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - नववधू आणि पतीचे घोरणे

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group