पोरांनो जिंकलात….!
भारताच्या तरूण संघाचा विश्वविजेतेपदाचा प्रवास
शनिवारी मध्यराञीच्या गुलाबी थंडीत इकडे आपण गाढ साखर झोपेत असतांना सातासमुद्रापार कॅरेबियन बेटावर १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, भारतीय संघातल्या तरूण पोरांनी विजेतेपदाचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. हा यशोप्रवास अत्यंत खडतर, आव्हानात्मक आणि ऐतिहासिक असाच आहे. तो जाणून नाही घेतला तर त्यांच्यावर मोठाच अन्याय ठरेल…
– जगदीश देवरे
ॲण्टीगुआ बेटावरच्या सर विवियन रिचर्डस मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लड संघाचा ४ गडी राखून खणखणीत विजय मिळवला आणि एकदा नव्हे पाचव्यांदा आणि एका रांगेत चौथ्यांदा या विजेतेपदाचा रूबाब जिवंत ठेवला. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे संपूर्ण भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने बंद आहेत आणि त्यामुळे कोविड सुरु झाला तेव्हा जेमतेम १६-१७ वर्षे वय असलेल्या या संघातील तरूण पोरांना एकही प्रथम श्रेणी सामना खेळण्याचा अनुभव मिळालेला नव्हता. तरीही थेट विश्वचषकासारख्या मोठया रंगमंचावर जावून, नव्हे तर तिथले विजेतेपदही खेचून आणून या पोरांनी कमाल केली आहे. हे असले विजय म्हणजे भारतीय क्रिकेटचे भविष्य दमदार खेळाडूंच्या हातात आहे याची ग्वाही देतात. या विजयानंतर बीसीसीआयतर्फे संघासाठी ४० लाखांची बक्षिसी जाहीर झाली आहे. The cash prize announced by us of 40 lakhs is a token of appreciation but their efforts are beyond value…magnificent stuff अशा शब्दात सौरभ गांगुलीने संघाची प्रशंसा केली आहे.
कोविडमुळे अभ्यास झाला नाही, लिखाणाचा सराव राहीला नाही वगैरे वगैरे कारणास्तव दहावीच्या परीक्षा ऑनलाईनच व्हाव्यात या मागणीसाठी आंदोलन करणारी मुलं याच आठवडयात आपल्याला बघायला मिळाली. कुठल्याशा “हिंदुस्तानी भाई” नावाच्या समाज विघातक आत्म्याला साद घालताना झालेला हा राडा एकीकडे आणि याच कोविडमुळे सरावासाठी आवश्यक असलेले प्रथमश्रेणी सामने खेळण्याची एकही संधी मिळाली नाही तरी त्यानंतर इतक्या मोठया स्पर्धेत जावून प्रतिकूल परिस्थितीत विजेतेपद पटकावणारा हा तरूण संघ दुसरीकडे, हा विरोधाभास खुप काही सांगून जातो आणि नव्या पिढीला शिकवून देखील जातो.
खेळ कोणताही असु दे, कारकिर्दीच्या सुरूवातीलाच खेळाडूंना इतकी मोठी संधी सहसा मिळत नाही. या संघातल्या खेळाडूंना ती मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. आता या एका विजयानंतर संघातल्या काही खेळाडूंना आयपीएल सारख्या मोठया स्पर्धेत सहभागाची संधी मिळणार आहे. कर्णधार यश धूल, राजवर्धन हंगरगेकर या खेळाडूंची नावे लिलावाच्या यादीत आधीच समाविष्ट झाली होती परंतु या विजयानंतर त्यांचा भाव वधारला नाही तर नवल, असेच म्हणावे लागेल. विराट कोहली, ईशान किशन, पृथ्वी शॉ, अंबाती रायडू, शिखर धवन, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, इरफान पठाण आधी त्यांच्या आधी मोहम्मद कैफ युवराज सिंग ही भारतीय संघात आलेली अशी नावे आहेत जी सर्वात सुरूवातीला १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गाजली. या यादीत आता आणखी काही नावांची भर पडणार आहे हे नक्की.
या सघांचे यश हे जरा वेगळे आहे याची सर्वप्रथम आपल्याला माहिती करून घ्यावीच लागेल. फायनलमध्ये हा संघ पोहोचला तो कांगारूंच्या संघाला सेमी फायनल मध्ये पराभूत करून. काही चाहत्यांनी या संघाची कामगिरी या विजयानंतर फॉलो करायला सुरूवात केली. परंतु त्याआधी काय झाले, हे जाणून घेणे गरजेचे आहे. साखळीतले सर्व ५ सामने जिंकून हा संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. साखळी सामने सुरु असतांना कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार शेख, सिध्दार्थ यादव यांच्यासह काही खेळाडूंना कोविडची लागण झाली होती तर काही क्वारंटाईन होते. नियमावलीमुळे संघात खेळवायला ११ खेळाडू तरी उपलब्ध रहातील की नाही अशी एक वेळ आली तेव्हा धास्ती वाढल्यानंतर बीसीसीआयने ५ अतिरीक्त खेळाडू भारतातून पाठवले होते. कर्णधार आणि उपकर्णधार दोघेही पॉझिटीव्ह असल्याने आर्यलंड विरूध्दच्या सामन्यात तर निशांत सिंधूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली गेली. पंरतु या सगळ्या अडचणींवर मात करणाऱ्या या संघाने साखळी सामने जिंकले, सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आणि मग विश्वचषक जिंकण्याची किमया देखील साधली. हा विजय खणखणीत म्हणायचाय तो याचसाठी. या विजयानंतर कर्णधार यशचे वक्तव्य खूप महत्त्वाचे आहे. तो म्हणतो की, सुरुवातीला आम्हाला एकत्र यायला खूप अवघड गेलं. परंतु जशी जशी स्पर्धा संपत आली तसे आमचे एखादे कुटूंब तयार होत गेले. यात सगळं आलं. हे
यश सांघिक अथक परिश्रमानंतर आले आहे याचीच अनुभूती या शब्दातून मिळते.
सेमी फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करतांना २९० धावांचे मोठे लक्ष्य देऊन ऑस्ट्रेलिया विरुद्धचा अर्धाअधिक सामना भारताने तिथेच जिंकला होता. कर्णधार यश धूलच्या ११० धावा आणि त्याची शेख रशीद सोबतची २०४ धावांची भागीदारी या सामन्यात निर्णायक ठरली. अंतिम सामन्याची आकडेवारी तर सर्वांसमोर आहे. अंतिम सामना असल्याने प्रथम फलंदाजी करतांना मोठे लक्ष्य उभे करून भारतीय संघाला दडपणाखाली ठेवण्याचा इंग्लडचा प्रयत्न भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: हाणून पाडला. ३०० प्लस नक्की, अशा वल्गना करीत फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लड संघाला जेमतेम १८९ धावा जमवता आल्या आणि त्यामागे कारणीभूत ठरले ते राज बावा (३१ धावा देवून ५ बळी) आणि रवी कुमार (३४ धावा देवून ५ बळी). खरेतर जेमतेम ७० धावा झालेल्या असतांना इंग्लडचे ६ गडी तंबूत परतलेले होते पंरतु त्यानंतर त्याचा डाव सावरला आणि १९८३ च्या विश्वचषक अंतीम सामन्याची आठवण करून देणारी धावसंख्या आणि काहीशी तशीच आठवण करून देणारा विजय साकार झाला.
या विजयातली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या यशामध्ये महाराष्ट्राचा असलेला सहभाग. क्रिकेट फक्त मुंबईतच पिकले जाते असा जो काही गोड गैरसमज इतके दिवस होता तो दूर होतोय हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उस्मानाबादचा अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकर, पुण्यातले विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे या तिनही खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली कामगिरी नोंद घेण्यासाठी सारखी आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर झालेला दारुण पराभव आणि त्याआधी विराट कोहली ने दिलेला राजीनामा, भारतीय क्रिकेट विश्वात आलेल्या या सगळ्या निगेटिव्ह बातम्यांच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात आलेली ही पहिली सुखद बातमी भारतीय क्रिकेट साठी एक आशादायक चित्र निर्माण करणारी आहे. अर्थात, त्यासाठी हा १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेटचा विश्वविजेता संघ अभिनंदनास नक्कीच पात्र ठरतो.