India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री – खरा जंगलप्रेमी किरण रहाळकर

India Darpan by India Darpan
July 27, 2022
in विशेष लेख
0

 

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
खरा जंगलप्रेमी किरण रहाळकर

येत्या 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा होईल. यानिमित्ताने ‘मानवी जीवन आणि बिबटे यांच्यातील संघर्ष’ या विषयाचे अभ्यासक, शास्त्रज्ञ तसेच जंगल कायदे विषयातील तज्ञ प्रशिक्षक किरण रहाळकर या तरुण, उमद्या निसर्गयात्रीची, त्यांच्या आगळ्यावेगळ्या कामाची ओळख आपण या सदरात करून घेऊ….

स्मिता अनिल सैंदानकर
मो. 9423932203

“नाशकात पुन्हा एकदा बिबट्याचा धुमाकूळ” , “बिबट्याची दहशत”अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या किंवा टेलिव्हिजनवर पाहिल्या की प्रश्न पडतो, धुमाकूळ घालायला बिबट्या म्हणजे कुणी गुंड, दरोडेखोर किंवा दहशतवादी आहे का? एखादा बिबट्या कधी अन्नाच्या आशेने तर कधी वाट चुकल्याने मानवीवस्तीत शिरतो. जंगलात त्याची भूक भागेनाशी झाली की तो मानवीवस्तीत पोहचतो.मिळेल ते जनावर मारतो आणि त्याची भूक भागवतो. या त्याच्या सर्व कृती त्याच्या शारीरिक गरजा भागवण्यापुरत्याच असतात. या प्राण्यांना माणसासारखी बुद्धी नसते त्यामुळे माणसासारखं एखाद्याचा हेतुपुरस्सर बदला घेणे, त्यासाठी सूडबुद्धीने ठरवून कोणावरतरी हल्ला करणे असं काही त्यांच्या गावीही नसतं .

खर तर जंगलक्षेत्र कमी कमी होत गेलं तसे प्राणी, पक्षी नाहीसे झाले. त्यामुळे त्याची भूक भागेनाशी होते आणि मग तो या माणसांच्या जंगलात एखाद्या आश्रितासारखा फिरू लागतो. जंगल तोडून बिबट्याला उघड्यावर आणायला खरंतर माणूसच जबाबदार आहे. या सर्व समस्यांना जवळून पाहिलेले नाशिकचे किरण रहाळकर हे मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष याचे अभ्यासक आहेत.ते म्हणतात,”माणसाने त्याची वस्ती शहराच्या आजूबाजूला इतरत्र अस्ताव्यस्त पसरवायला सुरुवात केली आणि त्यामुळे हळूहळू माणूस या प्राण्यांच्या अधिवासाजवळ जाऊन पोचला. प्राण्यांचं जंगल आणि मानवी वस्ती यातलं अंतर इतकं कमी झालं की हे प्राणी आता सहज मानवी वस्तीमध्ये पोचू शकतात आणि मग तिथेच सुरू होतो माणूस आणि जंगली प्राणीयांच्यातला संघर्ष.”

नाशिक म्हणजे निसर्गसंपन्न असा हा प्रदेश. डोंगर-दऱ्या आणि आजूबाजूला भरपूर झाडी यामुळे मुबलक जैवविविधता इथे बघायला मिळते. हेच पोषक वातावरण किरण रहाळकर यांच्यातलं निसर्गवेड जागृत करायला कारणीभूत ठरलं असावं.मूळचे नाशिकचेच असणारे किरण रहाळकर यांचं बालपण नाशिकच्या रविवार कारंजा सारख्या मध्यवस्तीत गेलं. परंतु लहानपणापासूनच निसर्गाची आवड असल्याने दर शनिवारी भरणाऱ्या निसर्ग कट्टा या निसर्गप्रेमींच्या गटात ते सामील झाले.तिथे भेटलेल्या निसर्गप्रेमींच्या सहवासात नाशिकच्या आजूबाजूला असणारी छोटी-छोटी जंगलं, डोंगरं, किल्ले पालथे घातले.त्यादरम्यान तिथल्या निसर्गात प्राणी-पक्ष्यांचा जवळून संबंध आला आणि मग निसर्गाबद्दलची ही आवड जास्तीत जास्त दृढ होत गेली. तिथूनच सुरू झालेल्या निसर्गवेडाने मग त्यांचा एक शास्त्रज्ञ आणि जंगल कायदे तज्ज्ञापर्यंतचा प्रवास सुरु झाला.

त्याकाळी डॉ. झ्याला यांचा एक लांडग्यांच्या संदर्भातला संशोधन प्रोजेक्ट नाशिकमध्ये चालू होता. किरणजींनी अकरावी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला होता. ते या संशोधन प्रकल्पाच्या सान्निध्यात आले आणि तिथून त्यांना या क्षेत्रातही करियर होऊ शकतं हा आत्मविश्वास आला. पुढे जाऊन त्यांनी पक्षीशास्त्र म्हणजेच ऑरनिथॉलॉजी या विषयाचा कोर्स केला. त्यातूनच मग एक शास्त्रीय दृष्टीकोन तयार झाला. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली आणि पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये बायोडायव्हर्सिटी विषयात एम एस्सी कोर्स पूर्ण केलं. किरण रहाळकर हे नाशिकचे ख्यातनाम प्राध्यापक तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटी या शंभर वर्ष जुन्या संस्थेचे अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर यांचे सुपुत्र.आई-वडील दोघेही उच्चशिक्षित प्राध्यापक असल्यामुळे घरातूनही त्यांच्या या अनोख्या करियरला कायम पाठिंबा मिळत गेला.

एम एस सी ला असताना’ बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष ‘या विषयावरती त्यांचं संशोधन सुरू झालं. त्यासाठी नाशिकच्या आजूबाजूच्या ऊसशेती असणाऱ्या अकोला, राजुर, संगमनेर यासारख्या ऊसशेत कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर अशा बिबट्यांच्या वावराचा काय परिणाम होतो हा त्यांच्या संशोधनाचा विषय. जवळजवळ अडीच वर्षे त्या भागात प्रत्यक्ष राहून प्राण्यांना रेडिओ कॉलरिंग करणे म्हणजे प्राणी कोणत्या भागात आहे हे सहज शोधता येतं, तसंच ट्रॅपिंग कसं केलं जातं अशा अनेक संबंधित विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी केला.

किरणजी सांगतात,” जेव्हा एखाद्या मानवी वस्तीत एखादा बिबट्या येतो तेव्हा माणूस आणि बिबट्या या संघर्षामध्ये माणसाला व्यक्त होण्याची शक्ती मिळालेली असल्यामुळे माणूस त्याच्या अडचणी सहज व्यक्त करतो परंतु, या प्राण्यांना ती शक्ती नसल्यामुळे त्यांचे प्रश्न काय आहेत हे कायम नजरेआड होतात. बिबट्याला जिथे पुरेसं पाणी, खाण्यासाठी पुरेसे प्राणी आणि नैसर्गिक अधिवास उपलब्ध होईल अशा ठिकाणी हे प्राणी रहिवास करतात.अशा वेळी चुकून जर हे प्राणी मानवी वस्तीत घुसले तरी त्यांना काही तिथे मुक्काम ठोकायचा नसतो. ते तिथून सुटकेचा मार्ग शोधत असतात. परंतु पहायला आलेल्या लोकांची गर्दी इतकी वाढते की मग त्यांना नाईलाजाने हल्ले करावे लागतात. पण अशावेळी दोष मात्र येतो या बिबट्यांवर.याला बऱ्याच अंशी सोशल मीडियादेखील कारणीभूत आहे.सोशल मीडिया मुळे या बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. या माध्यमांद्वारे हे बिबटे कुणी व्हिलन असल्यासारखे दाखवले जातात.परंतु त्यावेळी माणसाने निसर्गभान ठेवलं पाहिजे. तरच तेथे कोणालाही इजा न करता ते नक्की त्यांच्या मार्गाने निघून जातात.शेवटी या संघर्षामध्ये माणूस आणि बिबट्या या दोघांचीही जीव कसा वाचेल हे महत्त्वाचे.”

सध्या किरण रहाळकर डब्ल्यू सी टी म्हणजेच वाइल्ड लाइफ कनझर्वेशन ट्रस्ट या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. तिथे ते वाइल्डलाइफ लॉ एन्फॉर्समेंट हेड म्हणून कार्यरत आहेत. डब्ल्यू सी टी चं हेड ऑफिस मुंबई मध्ये असून भारतातल्या 21 राज्यांमध्ये त्यांचं काम चालू आहे.भारतातून होणारी विविध पक्षांची, कासवांची, माशांची, सापांची तसेच प्राण्यांच्या विविध अवयवांची तस्करी ही खूप दुर्दैवी आहे.ही तस्करी थांबवणे , त्यासाठी होणाऱ्या प्राण्यांच्या हत्या थांबवणे यासाठी त्या संदर्भातील विविध कायदे माहीत करून देणे हे सध्या त्यांच्या कामाचे स्वरूप आहे.

आत्तापर्यंत फॉरेस्ट खात्यातील ,तसेच जंगलांमध्ये काम करणाऱ्या 13000 कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील प्रशिक्षण त्यांच्या गटाने दिले आहे. त्यामध्ये जंगलासंदर्भातील कोणकोणते कायदे आहेत? जंगलाच्या हद्दीत घडलेली केस कशी हाताळावी,ती कोर्टात कशी मांडायची, पुरावे कसे जमा करायचे अशा विविध समस्यावर चर्चेच्या माध्यमातून तसेच केस स्टडीच्या माध्यमातून या लोकांना प्रशिक्षित केलं जातं. प्राण्यांना बोलता येत नाही त्यामुळे त्यांच्या बाबतीत झालेला गुन्हा शोधून काढणं हा सर्वात कठीण पण महत्वाचा प्रश्न असतो. या संदर्भामध्ये किरणजी कन्सर्वेशन डॉग युनिट हा भारतातला पहिला प्रयोग करत आहेत. एखादा जखमी प्राणी शोधणे किंवा एखाद्या प्राण्याच्या हत्येसंदर्भातले पुरावे शोधणे, प्राण्यांसाठी लावलेले सापळे शोधणे यासारखी कामं केवळ वासाच्या संवेदनेवर शोधण्याचं प्रशिक्षण या विशेष डॉग स्कॉडला दिले जात आहे. किरणजी या डॉग युनिट्सचेदेखील हेड आहेत.सध्या त्यांच्याकडे असे चार प्रशिक्षित कुत्रे आहेत. हा त्यांचा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल.

किरणजी म्हणतात,” माणसाचा निसर्गाशी असलेला संवाद संपला ,बांधिलकी संपली, जवळीक संपली आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कृत्रिम आपुलकी दाखवण्या कडे कल वाढला. आपणही या निसर्गाचाच एक क्षुल्लक भाग आहोत हे जोपर्यंत माणसाला समजत नाही,तोपर्यंत हे प्राणी आपल्या जीवनाचा भाग बनणार नाहीत. त्यांनाही ते जसे आहेत तसे स्वीकारू या”.प्रत्येकजण प्रत्यक्षरीत्या जरी जंगल वृक्षतोड करत नसलं तरी ती तुटत असताना मात्र असहाययपणे पाहत असतो. विकास साधायचा की जंगलं टिकवायची या प्रश्नाचे उत्तर माणूस वर्षानुवर्ष शोधत आहे. किरण रहाळकर निसर्ग आणि त्यातली जैवविविधता संरक्षणासाठी करत असलेले कार्य खरंच खूप वेगळं पण कौतुकास्पद आहे. ‘इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे मनात निसर्गाप्रती खरंच प्रेम असेल तर किती विविध मार्गांनी आपण त्याचं संवर्धन करू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे किरण रहाळकर.

मानवाने स्वतःला निसर्गामध्ये झोकून देण्यापेक्षा निसर्गालाच आपल्या सोयीने बदलण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच गल्लत झाली. निसर्गामध्ये माणसाने ढवळाढवळ केली आणि विविध अनपेक्षित समस्या निर्माण व्हायला सुरुवात झाली.माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागला.ही संपुर्ण पृथ्वी फक्त आपल्यासाठीच आहे अशा संभ्रमात जगू लागला. माणसाची ही वरचढ वृत्तीच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरेल. निसर्गातल्या प्रत्येक जीवाला त्याची जीवनशैली जगण्याचा अधिकार आहे.माणसाने स्वतः ची जीवनशैली निसर्गस्नेही केली तरच हे शक्य आहे.नाहीतर महात्मा गांधींनी म्हंटल्याप्रमाणे,” THE WORLD HAS ENOUGH FOR EVERYONE’S NEED,BUT NOT EVERYONE’S GREED”.

Column Nisarga Yatri True Forest Lover Kiran Rahalkar by Smita Saindankar


Previous Post

या व्यक्तींना आज मिळेल आकस्मिक शुभवार्ता; जाणून घ्या, गुरुवार, २८ जुलैचे राशिभविष्य

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – २८ जुलै २०२२

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - २८ जुलै २०२२

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group