इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया: जादव पायेंग
आपल्या भारतात सुद्धा असा एक बुफिए आहे बरं का. गेली कित्येक वर्ष हा झाडे लावण्याचे काम अखंड करत आहे. त्याचं नाव जादव पायेंग. आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी त्याने तब्बल तेराशे एकर जंगल तयार केले आहे. एकेकाळच्या रेताळ उघड्या बोडक्या जमिनीवर आता लाखो झाडं दिसत आहेत.वाघ माकड, नाना प्रकारचे पक्षी यांचा अधिवास या जंगलात आहे.

मो. 9423932203
फ्रेंच भाषेत ‘झाडं लावणारा माणूस’ नावाची एक प्रसिद्ध कथा आहे. ही कथा अशी की युरोपच्या डोंगराळ, निर्जन भागात एक मेंढपाळ राहत असतो. अंगापिंडाने बळकट पण अबोल. त्याचं नाव एल्जिआर्ड बुफिए. हा मेंढपाळ एकदा मेंढ्या चरायला सोडल्या की दररोज झाडांच्या शंभर बिया लावत असे. बिया पण चांगल्या निवडलेल्या खात्रीने जगतील अशा. या बिया आपण कोणाच्या जमिनीत पेरतोय, त्याचा फायदा कोणाला होईल याचा विचार न करता हा कित्येक वर्ष ते काम करत होता. असं करता करता त्याच्या कामातून दहा हजार झाडांचे रान तयार झाले. नंतर महायुद्ध सुरू झाले आणि या युद्धाच्या धामधूमीत लोक त्याला विसरूनही गेले. पण युद्ध संपलं तेव्हा त्या भागात एक चांगलं दाट जंगल तयार झालेलं होतं.
तिकडे युद्ध चालू असताना तो मात्र त्याचं झाडे लावण्याचे काम निष्ठेने करत राहिला. आता त्या जंगलातून झरे वाहू लागले. विविध वन्यप्राण्यांचा तिथे वावर असतो. तर अनेक कुटुंब तिथे शेती करतात. कालांतराने त्या रानाला सरकारी संरक्षण मिळवून देखील दिलं जातं. वयाच्या 87 व्या वर्षी बुफिए वारतो. खरं तर ही कथा काल्पनिक आहे. परंतु या कथेचा परिणाम एवढा आहे की आपल्याला बुफिए हा खरा माणूस असल्यासारखा वाटायला लागतो. या कथेवर जगभरात अनेक नाटकं, भाषांतर, नृत्यनाटिका झाल्या. चित्रपट निघाले.
आपल्या भारतात सुद्धा असा एक बुफिए आहे बरं का. गेली कित्येक वर्ष हा झाडे लावण्याचे काम अखंड करत आहे. त्याचं नाव जादव पायेंग. आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी त्याने तब्बल तेराशे एकर जंगल तयार केले आहे. एकेकाळच्या रेताळ उघड्या बोडक्या जमिनीवर आता लाखो झाडं दिसत आहेत.वाघ माकड, नाना प्रकारचे पक्षी यांचा अधिवास या जंगलात आहे. शेकडो जंगली हत्ती वर्षातले तीन चार महिने येथे मुक्कामाला येतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व जंगल त्यांनी स्वतःच्या कष्टातून उभे केले आहे कोणाचीही मदत न घेता. भरपूर अडचणी आल्या, संकटे उभी राहिली परंतु झाड लावण्याचा, वाढवण्याचं आणि राखण्याचं काम त्यांनी अखंड निष्ठेने केले. एक सर्वसामान्य माणूस त्याचं वृक्ष प्रेम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर किती मोठं काम करु शकतो याचं हे मूर्तीमंत उदाहरण. आसाममधल्या अरुणासापोरी या छोट्याशा गावात 1963 मध्ये जादव चा जन्म झाला.
वडील लकीराम आणि आई अफुली यांचं हे तिसरे अपत्य. पाच वर्षाचा असताना गावात शाळा नसल्याने वडिलांनी जादवला जोरहाट जिल्ह्यात त्यांच्या मित्राकडे शिकायला ठेवलं. तिथे त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात आई-वडील दोघेही मरण पावले. तेव्हा आता स्वतःच्या पायावर उभं राहणं भाग होतं. त्यावेळी त्यांना काम मिळालं ते चक्क झाडे लावण्याचं. 1979 मध्ये सरकारने ब्रह्मपुत्रा नदी जवळ 300 हेक्टर जागेत झाडे लावायची योजना आखली आणि त्या कामावर मजूर म्हणून जादवला नोकरी मिळाली पण ही योजना पाच वर्षे चालणार होती पण ती तिसऱ्याच वर्षी बंद पडली. बरेच कामगार काम सोडून निघून गेले. पण जादव मात्र तिथेच राहिले. सरकारने सोडून दिलेलं काम स्वतःचं मानून करत राहिले. कोणताही पगार, पैसे मिळत नसताना थोडीथोडकी नाही तर तब्बल पन्नास वर्षांहून अधिक हे काम करत आहेत. एकदा दुपारच्या वेळी जादव आपल्या जन्मगावी जायला निघाले होते. जाताना होडीतून जावं लागे. त्यावेळी होडीतून उतरल्यावर वाटेत त्यांना तीस-चाळीस मेलेले साप दिसले.
गावकऱ्यांनी सांगितलं हे साप नदीतून वाहत आले. कुठेही सावली नाही त्यामुळे आता ते अर्धमेले झालेले आहेत. आणि बहुतेक लवकरच मरून जातील. जादव यांच्या डोळ्यासमोर ते साप सारखे येऊ लागले. सावलीसाठी काय करता येईल हा विचार सतत त्यांना भेडसावू लागला आणि त्यांनी वन अधिकाऱ्यांच्यामागे तगादा लावला. नदीकाठच्या वाळून लावायला मला पंचवीस बांबूची रोपे आणि काही झाडांच्या बिया द्या. सुरुवातीला त्यांना वेड्यात काढलं गेलं परंतु तेवढ्यात भांडवलावर पुढे जादव यांनी मोठे जंगल उभारलं. जादवने ती 25 बांबूची रोपे नदीकाठी लावली. थोड्या काही म्हशी विकत घेतल्या. त्यांचे दूध विकून पोट भरायचं आणि बाकी सगळा वेळ झाडांसाठी द्यायचा असा त्यांचा दिनक्रम चालू झाला. एप्रिल ते जून या तीन महिने जादव जमेल तेवढी रोपं लावायचा आणि बाकीचे नऊ महिने वेगवेगळ्या ठिकाणाहून बिया गोळा करणें, रोपं वाढवणं आणि लावलेल्या झाडांची देखभाल करण्यासाठी द्यायचा. त्यांनी नाना प्रकारच्या वनौषधी, गवत, बांबू चे वेगवेगळे प्रकार, अनेक देशी-विदेशी प्रकारच्या बिया जमवल्या आणि त्या लावल्या.
झाडे जगवण्यासाठी मटका सिंचन पद्धत अवलंबली. त्यासाठी जेवढे जमतील तेवढे मडकी विकत घेऊन झाडांना वर्षभर पाणी दिलं जाई. झाडांना खत मिळावं यासाठी अनेक गांडूळ, मुंग्या त्यांनी पिशवीत भरून भरून जमिनीस सोडल्या. जादवच्या कष्टाला तोड नव्हती. झाडांची खरी गंमत अशी आहे की पहिली काही वर्ष झाडांना राखावं लागतं नंतर पुढची सगळी कामं ती स्वतः करतात. कारण झाडाची वाळलेली पानं,सुकलेल्या फांद्या खाली पडल्या की खाद्य मिळाल्यावर जमिनीतले सूक्ष्मजीव, गांडूळ वाढायला लागतात. आणि तेच या सेंद्रिय कचऱ्याचे दोनेक वर्षात उत्तम खत बनवतात. त्यामुळे झाडं आपोआप जोमाने वाढायला लागतात. गवताच्या झाडांच्या मुळ्या वाढल्या की त्या माती घट्ट धरून ठेवतात आणि मग जोराचा पाऊस वारा आला तरी सुद्धा मातीची धूप होत नाही. निसर्गाचं चक्र हजारो-लाखो वर्षापासून सुरू आहे पण माणूस हे चक्र नीट फिरू देत नाही. त्यात सतत अडथळे आणत राहतो. एकदा का हे चक्र फिरायला लागलं की ते थांबत नाही.झाडं लावणं हे खरंतर अंग मेहनतीचं काम.
पाऊस कोसळत असो किंवा कडक उन्हाळा, जादव हे काम करत राहिले. सामान्य माणूस कधीतरी निवृत्त होतो पण जादव यांना निवृत्ती नाही. कोणत्याही प्रकारची कमाई वाढवायची शक्यता नाही. शारीरिक कष्ट, विपरीत हवामान याला तोंड देत यादव निष्ठेने त्यांच कार्य करत राहिले. गावकऱ्यांनी जादव यांना मुलाई हे टोपण नाव दिले आणि कठोनी म्हणजे जंगल. मुलाई कठोनी म्हणजे जादव यांचं जंगल. सुरुवातीला जादव यांनी आपल्या कामासाठी सरकारी मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले पण, त्या सरकारी अधिकाऱ्यांनीही त्यांना धुडकावून लावलं. पण जोहरात गावातले जितू कलीत नावाचे एक पत्रकार आणि वन्यप्रेमी एकदा जादवच्या गावात आले. प्राण्यांचे फोटो काढताना काढण्यासाठी ते होडीतून फिरत असताना त्यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरामुळे ओकाबोका झालेला सर्व परिसर दिसला पण दूरवर एक हिरव्या रंगाचा जंगलाचा पट्टाही दिसला.
एवढी हिरवगार झाडी घनदाट जंगल पाहून त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. जितू कलीत यांनी जादवची सर्व कहाणी ऐकली. या माणसाचा हा भीमपराक्रम पाहून जितू कलित अवाक झाले आणि मग त्यांनी स्थानिक वर्तमानातून त्यांच्या कामगिरीवर सविस्तर लेख लिहिले. युट्युब वर त्यांच्या जंगलाचे फोटो आणि या कलंदर माणसाची मुलाखत टाकली. चारशे ते पाचशे हेक्टर जंगल एक हाती कोणीतरी निर्माण केलं आहे याचा सरकारला अचानक शोध लागला. कदाचित कलित आणि जादव यांची भेट झाली नसती तर जादव पायेंग यांचं हे अद्भुत कार्य आपल्यापर्यंत पोहोचल नसतं. त्यांच्या बातमीमुळे ते जगभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या कामाचं कौतुक झालं आणि विविध प्रकारची मदत मिळू लागली.
शिवाय अनेक हजारो लोकांना प्रेरणा मिळाली. 2012 मध्ये दिल्लीच्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने त्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया ही उपाधी दिली आणि त्यांचा सत्कार केला. त्यांनी जादव यांच्यावर एक माहितीपट तयार केला. देशविदेशातले पत्रकार पर्यावरणप्रेमींनी त्यांच्यावर अनेक माहितीपट बनवले.पर्यावरण विषयक काम करणाऱ्या आशिया सेंचुरी संस्थेने त्यांचा बहुमान केला. तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा मुंबईत भव्य सत्कार करण्यात आला .फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून या वनसंशोधन करणाऱ्या संस्थेने देखील त्यांच्या कामाची दखल घेतली. 2015 मध्ये फ्रान्स मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये यादव पा येंग एक निमंत्रित प्रतिनिधी होते.2016 मध्ये त्यांचा पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला. आता पुढचं उद्दिष्ट आहे पाच हजार एकर या मेलाही नावाच्या एका बेटावरच्या वनीकरनाचं. काम चालू केलं आहे ,लवकरच त्यालाही पूर्णता येईल.
आजच्या ग्लोबल जगात माणूस पैसा आणि प्रसिद्धीसाठी सुसाट धावत सुटला आहे पण स्व आनंद, समाधान यासाठी काम करणारे जादव फार विरळ असतात. प्रत्येकाने कधी ना कधी जमिनीत छोट्या छोट्या बिया पेरल्या असतील.उत्साहाने पाणी घातलं असेल आणि त्यातून कधी कोंब बाहेर येतो याची वाट बघितली असेल. त्या वेळेचा आनंद आठवा आणि लवकरच या पावसाळ्यापासून वृक्षारोपणाला सुरुवात करा. झाडं लावू आणि जगवू. तरच यापुढचे उन्हाळे जगण्याला सुसह्य होतील. एक सर्वसामान्य व्यक्ती जर एक जंगल तयार होऊ शकतो तर आपणही आपला छोटासा खारीचा वाटा त्यात नक्की देऊ शकतो.