वाइन कॅपिटल बरोबरच ग्रेपसिटी ऑफ इंडिया ही नाशिकची ओळख आहे. याच निमित्ताने एक वेगळीच नैसर्गिक आणि जैविक विविधताही निर्माण झाली आहे. त्याकडे अद्याप अनेकांचे फारसे लक्ष गेलेले नाही. त्याचाच वेध आज आपण घेणार आहोत.
सतीश गोगटे (ज्येष्ठ पक्षी निरीक्षक व पर्यावरणप्रेमी) मो. 9822059992
मागील लेखात आपण पाहिले की, सातमाळ रांगेमुळे नाशिक जिल्ह्यात हवामान बदल कसा होतो ते. सातमाळच्या दक्षिणेला दख्खनचे पठार चालू होते आणि फळभाजी पिकांमध्ये बदल व्हायला सुरवात होते. मुख्यत्वे करून गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात जमिनीत बदल होत जातो. लाल माती, रेताळ, मुरमाड माती बरोबरच काळी माती पण मिश्रित व्हायला लागते.
सातमाळच्या दक्षिणेला कादवा नदी ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. पेठ आणि दिंडोरी तालुक्याच्या सीमेवरून उगवणाऱ्या ह्या कादवा नदीवर तीन धरणे बांधली आहेत. करंजवण, पालखेड आणि कादवा-गोदावरी संगमावर नांदूरमध्यमेश्वर. कादवा नदीमुळे दिंडोरी आणि निफाड तालुक्यांना सिंचन प्राप्त झाले. निफाड तालुका हा कादवा आणि गोदावरीमुळे जलसंपन्न झाला. याचा प्रमुख फायदा द्राक्ष उत्पादनाला झाला यात दुमत नाही.
कादवा आणि गोदावरीचे पाणी तुलनेने जास्त क्षारता युक्त आहे. त्यामुळे जमिनीत अल्कलीचे आणि नायट्रोजनचे प्रमाण अधिक आहे. बागलाण तालुक्यात जमिनीमध्ये, आम्लचे प्रमाण जास्त आहे आणि नायट्रोजनचे प्रमाण कमी आहे. शिवाय निफाड आणि दिंडोरीमध्ये डिसेंबर ते एप्रिल या काळात तापमान ५ ते ३५ डिग्री असल्याने द्राक्षाच्या फळ धारणेस उपयुक्त आहे.
मला वाटतं, द्राक्ष हे फळ संपूर्ण जगात, फळ आणि त्यापासून बनणाऱ्या वाईनसाठी सुप्रसिद्ध झाले आणि कृषी पर्यटन आणि आर्थिक विकासही वृद्धिंगत झाल्याचे दिसते. द्राक्ष फळ मूळचे मध्य आशिया खंडातील आहे. इराण, जॉर्जिया, अर्मेनिया या प्रांतात द्राक्ष उत्पादन जवळजवळ सहा ते आठ हजार वर्षांपासून घेतले जाते. पर्शिया (इराण) प्रांतातील एक गाव, शिराज येथील द्राक्षांपासून बनणारी वाईन अजूनही त्याच नावाने प्रसिद्ध आहे. द्राक्षाला हिंदीत ‘अंगुर ‘तर इंग्रजीत ‘Grape’ असे म्हणतात. त्याचे सायंटिफिक नाव आहे Vitis vinifera, व्हिटीस विनिफेरा.
द्राक्ष पिकाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, टेबल ग्रेप्स म्हणजे ज्याचा खाण्यासाठी वापर केला जातो आणि वाईन ग्रेप्स म्हणजे ज्याचा वापर वाईन बनवण्यासाठी केला जातो. दोन्ही प्रकारच्या द्राक्षांच्या विविध जाती आहेत. संपूर्ण जगात द्राक्षाचे वार्षिक उत्पादन, आठ कोटी टन होते.
जवळजवळ ऐंशी देशांमध्ये उत्पादन होते. पूर्वी युरोपची मक्तेदारी होती, पण आता गेल्या वीस वर्षांत आशिया आणि अमेरिकेने पण आघाडी मारली आहे. सध्या चीन दीड कोटी टन वार्षिक उत्पन्न करून पहिल्या क्रमांकावर आहे तर साधारण तीस लाख टन उत्पादन करणारा भारत सातव्या क्रमांकावर आहे. त्यातील दहा लाखाहून अधिक उत्पन्न एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. शिवाय नाशिक मधून भारताच्या एकूण द्राक्ष निर्यातीच्या ५५ टक्के निर्यात होते. ह्या कारणांमुळे नाशिकला ‘ग्रेपसिटी’ ऑफ इंडिया म्हणले जाते.
टेबल ग्रेप्सच्या जातींपैकी थॉमसन सीडलेस ह्या जातीच्या द्राक्षांचा खप सर्वाधिक असून त्यांचे जास्तीत जास्त उत्पन्न नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. ह्या द्राक्षांना युरोप मध्ये वाढती मागणी आहे. इतर जाती मध्ये फ्लेम, सोनाका, माणिक चमन, शरद सीडलेस, तास -अ- गणेश या जातींचा समावेश होतो. वाईन ग्रेप्स च्या जातींमध्ये कॅबरनेट सोव्हिनिओ, कॅबरनेट क्रक, कॅबरनेट शिराज, मर्लो, शेनीन ब्लॉक, सोव्हेनिऑन ब्लॉक या प्रकारच्या जातीचे उत्पादन जास्त घेतले जाते.
द्राक्षवेल अनेक वर्षे जगणारा, बळकट, पानझडी वेल असून शाखायुक्त तणाव्यांनी चढतो. खोडावर साधी, एकाआड एक, हस्ताकृती व शिरांची, तळाशी हृदयाकृती व दातेरी किनारीची पाने असतात; शाखायुक्त परिमंजरीवर [→ पुष्पबंध] ऑक्टोबर-नोव्हेंबरात लहान, द्विलिंगी, नियमित, हिरवट व सुवासिक फुले येतात. बिंबाच्या तळातून चार सुटी केसरदले येतात.
रसाळ मृदुफळे गोलसर (सु. २ सेंमी. व्यासाची), लहान आणि बिया कठीण सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) व एक ते दोन असतात. निसर्गतः फळांचा प्रसार पक्ष्यांकडून होतो. द्राक्ष वेलाच्या विविध उपजाती व प्रकार यांमध्ये हिरवी, काळपट, लालसर, व पिवळट रंगाची फळे आढळतात. बिनबियांचे प्रकार निर्माण केलेले आहेत.
द्राक्षांचा हंगाम उन्हाळ्यात असतो, त्यानंतर वेलांची खरड छाटणी करतात. त्यात एक ते दोन डोळे ठेवून बाकीचे छाटले जातात. त्यामुळे नवीन फूट जोमदार निघते. ऑक्टोबर महिन्यात पुन्हा छाटणी करतात. त्यानंतर येणाऱ्या फुटीला फुले आणि फळे चांगली लागतात. साधारण १०० ते १५० दिवसात फळे तयात होतात. फळांच्या आकाराची व शर्करेचे प्रमाण साधण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते.
द्राक्ष फळ आंबट, गोडसर, मृदुफळ असल्याने सर्वांना आवडते. व्हिटॅमिन C आणि K भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे औषधी उपयोग बरेच आहेत. मायग्रेनच्या त्रासावर गुणकारी, उच्च रक्तदाब नियंत्रण, कॅन्सर प्रतिबंध, हृदयविकारावर उपयुक्त, मधुमेहावर लाभदायी, बद्धकोष्टते पासून मुक्ती अशी बरीच मोठी यादी करता येईल.
जगात द्राक्ष वाईनसाठी खूप मोठे मार्केट आहे आणि आता भारतातही वाईन उद्योजकांना खूप मोठी संधी आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वाईनचा उपभोग घेताना दिसतो. नाशिक जिल्ह्यात खऱ्या अर्थाने वाईन चा ब्रँड मात्र ‘सुला वाईन’ ने केला आणि तो सातासमुद्रापार नेला.
आजमितीस नाशिक जिल्ह्याची परदेशी पर्यटकांची संख्या वाढण्याचे कारण म्हणजे सुला वाईन्स.आणि हा एकच उद्योग नव्हे तर अजून ३० ते ३५ वाईन बनवणाऱ्या इंडस्ट्री नाशिक जिल्ह्यात आहेत. रेड वाईन, रोझ वाईन आणि व्हाइट वाईन हे वाईनचे प्रकार प्रामुख्याने लोकप्रिय आहेत. विविध द्राक्षांच्या नावावरून किंवा प्रदेशावरून वाईनला प्रॉडक्ट नाव देण्यास सुरुवात झाली. उदा. दिंडोरी वाईन, कॅबरनेट शिराज, विंचूर वाईन्स, निफा वाईनरी, वाघा वाईनरी या सारख्या उद्योजकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाईन उद्योगामुळे हा व्यापार काही महिन्यांचा न राहता बारमाही झाला आहे. दर फेब्रुवारी महिन्यात वाईन ब्रँडिंग साठी सुलाफेस्ट नावाचा इव्हेंट केला जातो.
तर मित्रांनो, भारताच्या ३३% द्राक्ष उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात खास वातावरण आणि पूरक जैवविविधता असल्यामुळेच नाशिकचे नाव जगाच्या पाठीवर उमटले आहे यात शंका नाही.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!